पोहायला आला; तरुणाचा जीव गेला! शासकीय जलतरण तलावातील प्रकार
By सुरेंद्र राऊत | Published: May 4, 2024 10:11 PM2024-05-04T22:11:18+5:302024-05-04T22:11:48+5:30
ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता घडली. हा युवक नेहमीच पाेहाण्यासाठी शासकीय जलतरण तलावावर येत हाेता. त्याला पाेहाण्याचा अनुभव हाेता.
यवतमाळ : शहरातील आझाद मैदान येथील जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता घडली. हा युवक नेहमीच पाेहाण्यासाठी शासकीय जलतरण तलावावर येत हाेता. त्याला पाेहाण्याचा अनुभव हाेता. यावर्षीचा त्याचा शनिवार हा पहिलाच दिवस हाेता. त्याने सवयीप्रमाणे थेट आठ फूट खाेल पाण्यात उडी मारली. मात्र, ताे बुडत असल्याचे काहींच्या लक्षात आले. त्याला तातडीने पाण्याबाहेर काढले. युवकाने बाहेर उलटी केली, यात त्याच्या पाेटातील अन्न बाहेर आले.
अंकित भाेयार (२५), रा. सेजल रेसिडेंसी पाटीपुरा असे मृत युवकाचे नाव आहे. अंकित दरवर्षी उन्हाळ्यात पाेहण्यासाठी येत हाेता. यंदा त्याने शनिवारीच प्रवेश निश्चित करून सायंकाळी ६ ते ७ वाजेची बॅच निवडली. मात्र, पहिल्याच दिवशी त्याचा घात झाला. अंकित थेट आठ फूट खाेली असलेल्या भागाच्या काठावर जाऊन त्याने पाण्यात उडी घेतली. लगेच ताे बुडू लागला. त्याची अवस्था पाहून तातडीने बाजूच्या दाेघांनी त्याला बाहेर घेतले.
यावेळी पाेट दाबून अंकितच्या पाेटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अंकितला उलटी झाली, त्याच्या पाेटातून अन्न बाहेर आले. ताे अत्यवस्थ असल्याने तातडीने लगतच्या खासगी रुग्णालयात नेले, तेथील डाॅक्टरांनी अंकितला शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले. शासकीय रुग्णालयात डाॅक्टरांनी अंकितला मृत घाेषित केले. अंकितचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला, की दुसरे कुठले कारण आहे हे शवचिकित्सा अहवालातून उघड हाेणार आहे. याप्रकरणी शहर पाेलिसांकडून अकस्मात मृत्यूची नाेंद घेणे सुरू हाेते