दांडी बहाद्दरांवर कॅमेरांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 08:55 PM2019-04-27T20:55:55+5:302019-04-27T20:57:17+5:30
जिल्ह्याचा कारभार सांभाळणाऱ्या मिनिमंत्रालयाची इमारत बहुमजली आहे. त्यामुळे कर्मचारी कधी आले अन् कधी गेले यावर विभागप्रमुखांचा ‘वॉच’ राहात नाही. यावर उपाय म्हणून आता महाराष्ट्र दिनापासून ‘सेंट्रलाईज’ हजेरी सुरू केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याचा कारभार सांभाळणाऱ्या मिनिमंत्रालयाची इमारत बहुमजली आहे. त्यामुळे कर्मचारी कधी आले अन् कधी गेले यावर विभागप्रमुखांचा ‘वॉच’ राहात नाही. यावर उपाय म्हणून आता महाराष्ट्र दिनापासून ‘सेंट्रलाईज’ हजेरी सुरू केली जाणार आहे. शिवाय या हजेरीवरही सीसीटीव्ही कॅमेरांची नजर राहणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत जवळपास ३०० कर्मचारी कार्यरत आहेत. शिवाय माध्यमिक शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी, बांधकाम यांची काही कार्यालये इतरत्र आहेत. या सर्व ठिकाणच्या कर्मचाऱ्यांसाठी आता सेंट्रलाईज कंट्रोल असलेल्या बायोमेट्रिक मशिन बसविल्या जाणार आहेत. सध्या मुख्य इमारतीत चार आणि इतर ठिकाणी चार मशिन बसविण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेने यापूर्वीही बायोमेट्रिक मशिन बसविल्या होत्या. मात्र त्या विभागवार असल्याने त्यातील ‘रिपोर्ट’बाबत खुद्द सीईओंनाच साशंकता होती. त्यामुळे आता तळमजल्यावरच बायोमेट्रिक मशिन बसवून कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्याला कोणत्याही मशिनवर थम्ब करण्याची सोय देण्यात येणार आहे. शिवाय या प्रत्येक मशिनवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. त्यामुळे लेटलतिफ कर्मचाºयांवर विभाग प्रमुखांसह थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा वॉच राहणार आहे. कोणत्याही कर्मचाºयाला बायोमॅट्रिक मशीन बंद होती अशी सबबही सांगता येण्याची आता सोय राहिलेली नाही.
टेबलवर जाऊन रजिस्ट्रेशन
कामात टंगळमंगळ करणारे जिल्हा परिषदेचे कर्मचारी बायोमेट्रिक मशिनसाठी रजिस्ट्रेशन करून घेण्यातही उत्सुक नाहीत. त्यामुळे मशिन ‘इन्स्टॉल’ करणारे अधिकारी प्रत्येक टेबलपर्यंत मशिन घेऊन जात आहे. तेथे जागच्या जागीच रजिस्ट्रेशन करून घेतले जात आहे. एक मेची सुटी संपताच दोन मेपासून ही बायोमेट्रिक हजेरी सक्तीची केली जाणार आहे.