वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीसाठी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:28 PM2018-06-30T22:28:05+5:302018-06-30T22:29:07+5:30
हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी करीत महाराष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. रविवारी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव गहुली (ता. पुसद) येथून ही मोहीम सुरू होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी करीत महाराष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविली जाणार आहे. रविवारी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव गहुली (ता. पुसद) येथून ही मोहीम सुरू होणार आहे.
याबाबत शनिवारी यवतमाळात माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांनी तातडीने बैठक घेऊन या मोहिमेची आखणी केली. ‘हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक भारतरत्न पुरस्कार अभियान समिती’ स्थापन करण्यात आली. यापुढे प्रत्येक जिल्ह्यात ही सर्वसमावेशक समिती पोहोचून प्रत्येक गावातून स्वाक्षºया गोळा करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
माजी खासदार नाना पटोले यांनी गुरुवारी ‘फसव्या कर्जमाफीचा पंचनामा’ आंदोलनात वसंतराव नाईकांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली होती. तोच धागा धरून शनिवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला वामनराव कासावार यांच्यासह आमदार हरिभाऊ राठोड, डॉ. टी. सी. राठोड, माजी आमदार विजयाताई धोटे, डॉ. रमाकांत कोलते, देवानंद पवार, माधव सरकुंडे, अॅड. मिनाज मलनस, अॅड. जयसिंह चौहान, अॅड. प्रफुल्ल मानकर, मनिष पाटील, ्नराजेंद्र हेंडवे, जयानंद खडसे, हरिश राठोड, हेमंत कांबळे, धनंजय मानकर, बाबूसिंग कडेल, वसंत जाधव, हरिविजय राठोड, अॅड. आर. एच. घरडे आदी उपस्थित होते.
या मोहिमेत सर्वपक्षीय आजी, माजी आमदार, खासदार, मंत्री यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले. गहुली ते दिल्ली अशी ही मोहीम ५ डिसेंबरला संपवून कोट्यवधी सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविले जाणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाकडून स्वाक्षरी घेण्यासाठी माजी खासदार नाना पटोले संपूर्ण राज्य पिंजून काढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.