विडुळ आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:42 AM2021-05-09T04:42:53+5:302021-05-09T04:42:53+5:30
विडुळ : उमरखेड तालुक्यातील विडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी लसीकरणासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. लस घेण्यासाठी गोंधळ होऊन ...
विडुळ : उमरखेड तालुक्यातील विडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी लसीकरणासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली.
लस घेण्यासाठी गोंधळ होऊन वाद होण्याची चिन्हे आहेत. लस घेण्यासाठी अनेक नागरिक प्रतीक्षेत असताना अत्यंत कमी प्रमाणात लस उपलब्ध झाली. त्यामुळे आरोग्य केंद्रात गर्दी होत असून, सकाळपासूनच लाभार्थींची झुंबड उडत आहे. यातून केंद्राच्या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. परिणामी लसीकरण केंद्रच कोरोना प्रादुर्भावाचे ‘हॉट स्पॉट’ ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
विडुळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आठ उपकेंद्रे आहेत. जवळपास ५५ ते ६० हजार लोकसंख्या आहे. विडुळ केंद्र उमरखेडपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे उमरखेड येथील अनेक नागरिक येथे येतात. तथापि, विडुळ केंद्रात अद्याप १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरण सुरू झाले नाही. त्यामुळे तरुणांची घालमेल होत आहे. केंद्रातील काही कर्मचारी चेहरे पाहून लसीकरण करीत असल्याची चर्चा आहे. यामुळे तरुण लाभार्थींमध्ये रोषाचे वातावरण निर्माण होऊन गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चेहरे पाहून लसीकरण करणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त न केल्यास संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.