कालवा कचऱ्याने अडला; रबीची काळजी तुंबली
By admin | Published: November 18, 2015 02:32 AM2015-11-18T02:32:44+5:302015-11-18T02:32:44+5:30
हस्तापूर-सावंगी (मांग) भागातील शेतकऱ्यांच्या शेतात बेंबळा कालव्याचे पाणी पोहोचत नसल्यामुळे जमीन तयार करून बसलेले शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.
अभियंत्याचे दुर्लक्ष : जमीन तयार; आता प्रतीक्षा पाण्याची
आरिफ अली बाभूळगाव
हस्तापूर-सावंगी (मांग) भागातील शेतकऱ्यांच्या शेतात बेंबळा कालव्याचे पाणी पोहोचत नसल्यामुळे जमीन तयार करून बसलेले शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. या शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा असली तरी कालवे विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अधीक्षक अभियंत्यांनीच या ठिकाणी भेट देण्याची मागणी होत आहे.
रबी हंगामाकरिता प्रकल्पाचे पाणी मुख्य कालव्यामधून सोडण्यात आले आहे. मात्र यातील पाणी हस्तापूर-सावंगी (मांग) रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचतच नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी संतप्त झाले आहे. पाटसऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काडीकचरा गोळा झाला आहे. झाडेझुडपेही वाढली आहे. यामुळे पाणी येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. पाणी सोडण्यापूर्वीचे नियोजन कालवे विभागाने केलेच नाही. त्यामुळे या भागातील बळीराजा आता संकटात सापडला आहे. रबी हंगामात गहू, हरभरा याकरिता शेतकऱ्यांनी आपली जमीन तयार करून ठेवली आहे. मात्र हस्तापूर मार्गावरील सुरुवातीचे चार-पाच शेत वगळता पाणी पुढे सरकायलाच तयार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कालवे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. मात्र त्याचा काहीही उपयोग होवू शकला नाही. नंतर शेतकऱ्यांनी उपअभियंता जळेकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण सेवानिवृत्त झाल्याचे सांगितले. आपला प्रभार पी.एन. गोतमारे यांच्याकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. गोतमारे यांच्याकडूनही व्यवस्थितरित्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. त्यामुळे जमीन तयार करून पाण्याच्या प्रतीक्षेत बसून असलेले शेतकरी मेटाकुटीस आले आहे.
सध्याच्या स्थितीत कृष्णा दांडगे, संजय मदने, अरुण मदने, संजय खोडे, शेख रहेमतुल्ला, किशोरीलाल गुप्ता, बबलू दातारकर, अभय तातेड, वैभव चेंडकापुरे, शहेजाद शेख, अशोक रोम, सैयद जहीर, नरेश चेंडकापुरे, नयना चेंडकापुरे, गारगाटे, डवले, भाऊ ठाकरे, नंदकुमार गुप्ता आदी शेतकरी धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांच्या शेताच्या धुऱ्यावर केवळ कालव्याच्या पाण्याची ओल आली आहे. सोयाबीनने दगा दिल्यामुळे रबी हंगामावर आशा लावून बसलेला शेतकरी अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे खचून गेला आहे. आता अधीक्षक अभियंत्यांनी या ठिकाणी भेट द्यावी, अशी मागणी होत आहे.