वनरक्षक भरतीचा पेपर दुसऱ्या दिवशीही रद्दच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 09:45 PM2019-06-10T21:45:38+5:302019-06-10T21:45:55+5:30
रविवारी वनरक्षक पदाचा पेपर अर्ध्यावर रद्द करण्यात आला. सोमवारीही वनविभागाच्या भरतीचा पेपर घेण्यात येणार होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सोमवारचाही पेपर रद्द करण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी महापोर्टलच्या परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रविवारी वनरक्षक पदाचा पेपर अर्ध्यावर रद्द करण्यात आला. सोमवारीही वनविभागाच्या भरतीचा पेपर घेण्यात येणार होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सोमवारचाही पेपर रद्द करण्यात आला. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी महापोर्टलच्या परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली आहे.
रविवारी वनरक्षक पदाच्या पेपरदरम्यान मोठा गोंधळ झाला. यामुळे दोन्ही सत्रातील पेपर रद्द करण्यात यावे. इतकेच नव्हेतर महापोर्टलच्या परीक्षाच रद्द करण्यात याव्या. पूर्वीप्रमाणे लेखी परीक्षा घेण्यात यावी, संबंधित यंत्रणेवर कारवाई करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
वनरक्षक भरती प्रक्रिया महापोर्टलच्या माध्यमातून राबविली जात आहे. या परीक्षेत एकाच संगणकावर दोन विद्यार्थी बसविण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षेचे नियोजन नव्हते. विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नव्हती. दीड ते दोन तास पेपर उशिरा सुरू करण्यात आला. महापोर्टलच्या परीक्षेवर प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नव्हते. यामुळे हा गोंधळ उडाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. यावेळी महेश ढवळे, देवा राठोड, सुशिल शेंद्रे, रवींद्र राठोड, अंकुश चक्करवार, पंकज राजूरकर, पे्रम चिकाटे, नीलेश तिजारे उपस्थित होते.
परीक्षा केंद्रावर गोंधळ झाला नाही. एकाच डेक्सटॉपवर दोन विद्यार्थी बसले नाही. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे. तांत्रिक अडचणीमुळे सोमवारचा पेपर रद्द करण्यात आला. तसे एसएमएस विद्यार्थ्यांना पाठविले. परीक्षेची नवी तारीख विद्यार्थ्यांना कळवू.
- अविनाश पवार, महापरीक्षा आयटी सेल, यवतमाळ