नरभक्षक ‘अवनी’ला नाईलाजाने ठार केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:02 IST2018-11-15T00:01:23+5:302018-11-15T00:02:14+5:30
आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणाºया नरभक्षक वाघिण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली. त्या रात्रीही बेशुद्धीचा प्रयत्न झाला.

नरभक्षक ‘अवनी’ला नाईलाजाने ठार केले
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणाºया नरभक्षक वाघिण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली. त्या रात्रीही बेशुद्धीचा प्रयत्न झाला. मात्र तिने थेट झडप घातल्याने आमच्या सोबतच्या इतरांचे संरक्षण करण्यासाठी नाईलाजाने तिच्यावर गोळी झाडावी लागली, अशी स्पष्टोक्ती हैदराबाद येथील शुटर (हंटर) नवाब शहाफत अली खान यांनी दिली.
राळेगाव-पांढरकवडा तालुक्यातील वाघग्रस्त सावरखेड, वरध, वेडशी, खैरगाव, बोराटी, सराटी, लोणी, बंदर, तेजनी, विहीरगाव, वाढोणाबाजार व परिसरातील अनेक गावातील नागरिकांनी एकत्र येऊन मंगळवारी रात्री सावरखेड येथे नवाब व त्यांच्या मुलाचा आणि इतर दोघांचा जाहीर सत्कार घेतला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नवाबने उपरोक्त भूमिका मांडली.
सोशल मीडिआ, राजकीय मंडळी, पक्ष व वन्यजीव प्राणी मित्र आदी नरभक्षक अवनी वाघिणीस का मारले, असा जाब सरकारला विचारत असताना वाघिणग्रस्त परिसरातील ग्रामस्थांनी हा जाहीर सत्कार केला. सुमारे वर्षभर वन कर्मचाऱ्यांना हुलकावणी दिल्यानंतर अवनीला ठार मारण्यात यश आले. याच नरभक्षक वाघिणीने १३ शेतकरी, मजुरांचे बळी घेतले. वाघिण ठार झाल्याने परिसरातील जनता आनंदी झाली. खैरगाव कासार येथील स्वाती ठाकरे यांनी वाघिण ठार झाल्यामुळे जनता मोकळा श्वास घेऊ लागली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
ग्रामस्थांनी शहाफत अली खान, अजगर अली खान व दोघांचा शाल, श्रीफळ व वाघिणीचे छायाचित्र भेट देऊन सत्कार केला. यावेळी अशोक केवटे, अरविंद वाढोणकर, अरविंद फुटाणे आदींनी मत मांडले. अवनीच्या मृत्यूवरून राजकीय पक्षांनी, नेत्यांनी राजकारण करू नये, असे त्यांनी ठणकावले. प्राण्यांच्या जीवापेक्षा मानवाचा जीव महत्वाचा असून वन्यप्राणीमित्रांनी वाघग्रस्त भागातील लोकांच्या भावना जाणून घ्यावा, असे आवाहनही केले. आभार वेडशीचे सरपंच अंकुश मुनेश्वर यांनी मानले.
शेवटपर्यंत अवनीला वाचविण्याचा प्रयत्न
सत्काराला उत्तर देताना शूटर शहाफत अली खान यांनी मीदेखील प्राणीमित्रच आहे. मानवाप्रमाणे, प्राण्यांप्रमाणे वन्यप्राण्यांचाही प्राण आहे. त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. मी आजपर्यंत अनेक ठिकाणी वाघांना बेशुद्धदेखील केले. सुरुवातील ट्रॅक्यूलाईझ डॉट मारला. आता १५ ते २० मिनिटांनी ती बेशुद्ध होईल असे वाटले. पण ती अधिक आक्रमक झाली. अवनी झुडूपात लपली. आम्ही पाळतीवर होतो. अशातच तीने आमच्या जिप्सीवर हल्ला केल्याने शेवटच्या क्षणी आमचे प्राण धोक्यात येणार होते. आम्ही रक्षणार्थ गोळी झाडली. मात्र गोळी झाडताना प्रचंड वेदना झाली. तथापि नाईलाज होता, असे त्यांनी स्पष्ट केले.