नरभक्षक पट्टेदार वाघ फॉरेस्टच्या लोकेशनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 09:41 PM2017-09-18T21:41:44+5:302017-09-18T21:42:06+5:30
सहा जणांचा बळी घेणाºया नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी पाच पथके रात्रंदिवस जंगल पालथे घालत असून दोन पट्टेदार वाघ कॅमेरात ट्रॅप झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सहा जणांचा बळी घेणाºया नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी पाच पथके रात्रंदिवस जंगल पालथे घालत असून दोन पट्टेदार वाघ कॅमेरात ट्रॅप झाले आहे. जंगलात पाच पथकातील शंभर सदस्य या वाघांचा शोध घेत असून लवकरच वाघ जेरबंद होतील, असे वन विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
राळेगाव तालुक्यातील सखी येथे सतीश कोवे या तरुणाचा वाघाने बळी घेतला. त्यामुळे गावकरी संतप्त झाले. संतापाच्या भरात वन विभागाचे समजून उपविभागीय महसूल अधिकाºयांचे वाहन पेटवून दिले. त्यामुळे वन विभागात खळबळ उडाली. तत्काळ वाघाला पकडण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली. वाघाच्या अस्तित्वाबाबत परिसरात अनेक अफवा पसरविण्यात येत होत्या. मात्र आता सराटी-बोराटी कंपार्टमेंटच्या १५७ व १५० मध्येच वाघाच्या सर्वाधिक हालचाली असल्याचे पुढे आले. रविवारी सायंकाळी वरुड रस्त्यावर लोणी शिवारात वाघ दिसल्याचा स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले. वन विभागाच्या पथकाने या आॅपरेशनची संयुक्त आखणी केली आहे. वन विकास महामंडळाचे स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी, पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी पाच पथकातील कर्मचारी या जंगलात वाघाचा शोध घेत आहे. प्रत्येक पथकाजवळ एक ट्रॅग्युलर गण आहे. शिवाय सराटी, बोराटी, सखी या परिसरात मचान लावण्यात येणार आहे. या मचानवरून ट्रॅग्युलायझेशन केले जाणार आहे.
ट्रॅप कॅमेरे व पगमार्कवरून दोन वाघ असून त्यातील मादी ही नरभक्षक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोनही वाघाचे छायाचित्र प्राप्त झाले असून यातील नेमकी मादी कोणती हे स्पष्ट होणे शक्य नाही. चंद्रपूर येथील स्पेशल पथकही दाखल झाले असून प्रत्येकांना स्वतंत्र मार्ग ठरवून दिले आहे. ट्रॅप कॅमेराची संख्या वाढवून वाघाचे अधिक स्पष्ट छायाचित्र घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. तसेच सराटी-बोराटी परिसरातील कंपार्टमेंट १५७ मध्ये दोन पिंजरे तर कंपार्टमेंटमध्ये एक पिंजरा लावण्यात आला आहे. पाच टीममधील सदस्य रात्रंदिवस जंगल पालथे घालत आहे. मध्यंतरी या भागात पाऊस झाल्याने पगमार्क घेताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. नरभक्षक वाघाला कोणत्याही परिस्थितीत जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असून उपवनसंरक्षक पांढरकवडा, वन विकास महामंडळाचे उपवनसंरक्षक मानद वन्यजीव यांच्याकडून संयुक्त उपक्रम राबविले जात आहे. ही मोहीम कधी फत्ते होते याकडे लक्ष लागले.
वाघाच्या शोधार्थ ६० ट्रॅप कॅमेरे -अभर्णा
राळेगाव : वाघाचा शोध घेण्यासाठी ६० पेक्षा अधिक ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे, अशी माहिती पांढरकवडा येथील उपवनसंरक्षक के.एम. अभर्णा (आयएफएस) यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. अभर्णा म्हणाल्या, वाघाच्या शोधार्थ पाच रेस्क्यू टीम काम करत असून त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरणार आहे. या भागात शांतता कायम ठेवल्यास नरभक्षक वाघाला लवकरच जेरबंद करणे सहज शक्य होईल. या भागात दोन पट्टेदार वाघ दृष्टीस पडले आहे. कॅमेरामध्ये त्यांची छायाचित्रेही आली आहेत. त्यातील एक वाघ लोणी-वरध मार्गावर तर बोराटी-वरूड मार्गावर दुसरा वाघ आढळला. सुमारे चार किलोमीटरच्या परिघात हे वाघ फिरत आहे. त्यांना बेशुद्ध करुन पकडण्यासाठी वन विभागाची ही संयुक्त मोहीम असल्याचे डीएफओ अभर्णा यांनी स्पष्ट केले.