मोक्याच्या जागा काबीज करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 09:54 PM2019-06-16T21:54:11+5:302019-06-16T21:55:43+5:30
प्रस्थापित व्यवस्था ही सहजासहजी न्याय देत नाही. न्यायासाठी सतत संघर्ष करावा लागतो. समाजाला प्रगतीपथावर आणण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व परिश्रम घेऊन मोक्याच्या जागा काबीज कराव्या, असे आवाहन बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रस्थापित व्यवस्था ही सहजासहजी न्याय देत नाही. न्यायासाठी सतत संघर्ष करावा लागतो. समाजाला प्रगतीपथावर आणण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व परिश्रम घेऊन मोक्याच्या जागा काबीज कराव्या, असे आवाहन बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी केले.
येथे पार पडलेल्या अमरावती विभागीय बिरसा अभिवादन परिषदेत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवनात हा कार्यक्रम पार पडला. विचार मंचावर उद्घाटक प्रा. डॉ. अशोक राणा, महासचिव प्रमोद घोडाम, राज्य उपाध्यक्ष दिनेश अंबुरे, उत्तम कनाके, प्रा. डॉ. हरिष धुर्वे, अमरावती जिल्हाध्यक्ष मारोती उईके, अकोला जिल्हाध्यक्ष राजेश मस्के, वाशिम जिल्हाध्यक्ष संतोष ठाकरे, राज्य संघटक वसंत कनाके उपस्थित होते.
विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना शाळा, महाविद्यालय, कार्यालयात जातीयवादाचे चटके लागल्यास, स्वत:चे मनोबल खच्ची करुन स्वत:ला संपवू नका. संघर्ष करा. गरज पडल्यास एकदा तरी मदतीसाठी बिरसा क्रांती दलाला आवाज द्या, असे आवाहन महासचिव प्रमोद घोडाम यांनी केले. यावेळी जागतिक पातळीवर संशोधन सादर करणारे दाते महाविद्यालयातील प्रा. डॉ. हरिष धुर्वे, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयातील पल्लवी उमरे यांच्यासह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू, नीट परीक्षा, इयत्ता दहावी, बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प, प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक प्रा. कैलास बोके, सूत्रसंचालन संजय मडावी यांनी केले. तर आभार शिवनारायण भोरकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रफुल्ल कोवे, गणेश फुपरे, अतुल कोवे, शरद चांदेकर, रमेश मडावी, प्रवीण कंगाले, रवी आत्राम यांनी परिश्रम घेतले.