दारू ढोसून गाडी दामटली; पोलिसांनी दंड लावून जिरवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 05:00 AM2021-12-26T05:00:00+5:302021-12-26T05:00:36+5:30
नशा करून वाहन चालविताना आढळल्यास पाच हजारांचा दंड केला जाणार आहे. जिल्ह्यात केंद्रीय सुधारित मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे दंडाच्या रकमाही वाढल्या आहे. दारूसह हेल्मेट न घालता दुचाकी पळविणाऱ्या ६३९ वाहन चालकांकडूनही वर्षभरात पोलिसांनी ३ लाख १८ हजार ९०० रुपयांचा घसघशीत दंड वसूल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भरधाव वाहनांच्या अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असूनही बेलगाम ड्रायव्हिंग थांबायला तयार नाही. चक्क दारू ढोसून नशेत तर्र होऊन दुचाकी, चारचाकी दामटणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वर्षभरात अशा ६८७ दारुड्या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच इंगा दाखविला. त्यांच्याकडून ३ लाख ८८ हजारांचा दंड वसूल केला. मात्र अजूनही नशेत वाहन दामटणाऱ्यांचे प्रमाण घटलेले नाही.
येत्या थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर ‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह’च्या केसेस वाढण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक पोलीसही सज्ज झाले आहे. नशा करून वाहन चालविताना आढळल्यास पाच हजारांचा दंड केला जाणार आहे. जिल्ह्यात केंद्रीय सुधारित मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे दंडाच्या रकमाही वाढल्या आहे.
दारूसह हेल्मेट न घालता दुचाकी पळविणाऱ्या ६३९ वाहन चालकांकडूनही वर्षभरात पोलिसांनी ३ लाख १८ हजार ९०० रुपयांचा घसघशीत दंड वसूल केला. मात्र अजूनही बहुतांश वाहन चालक हेल्मेटकडे दुर्लक्ष करीत आहे.
नवीन कायद्यांतर्गत दंडाच्या रकमा वाढल्या
- सुधारित मोटर वाहन कायद्यात दंड वाढविण्यात आला आहे.
- वाहनाची कागदपत्रे न बाळगणे ५ हजार, विना हेल्मेट वाहन चालविणे १५००, विनाकारण हाॅर्न वाजविणे ५०० व दुसऱ्या वेळी १५०० असा दंड आकारला जाणार आहे.
गाडी चालविताना मोबाईलवर बोलू नये
- वाहन चालवित असताना मोबाईलवर बोलल्यास नवीन नियमानुसार १ हजार, दुसऱ्यावेळी दोन हजार रुपयांचा दंड केला जाताे.
- अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन दिसल्यास पाच हजार रुपये दंड केला जाणार आहे. त्यामुळे काळजी घ्यावी.
वर्षभरात सात लाखांचा दंड केला वसूल
- सुधारित मोटर वाहन कायदा आता अमलात आला असला तरी गेल्या वर्षभरापासूनच नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. विनापरवाना वाहन चालविणे, परवाना मुदतबाह्य झाल्यानंतरही वापरणे, वाहनांची शर्यत लावणे, विनाकारक हाॅर्न वाजविणे, विमा न काढताच वाहन वापरणे, वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, ट्रिपल सीट जाणे अशा गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात आली.
- नंबर प्लेट सहज वाचता येईल, अशी ठेवण्याचा नियम आहे. तरीही अनेक जण नंबर प्लेटची छेडछाड करतात. त्यांच्यावरही पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
- हेल्मेट न घालता वाहन चालविणे, दारू ढोसून वाहन चालविणे अशा गुन्ह्यात पोलिसांनी सात लाख सहा हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला.