भविष्यात अभियंत्यांसाठी करिअर, रोजगाराच्या प्रचंड संधी -नवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 10:27 PM2019-06-18T22:27:00+5:302019-06-18T22:27:57+5:30
सायन्स, डिप्लोमा, अभियांत्रिकी, आर्किटेक्चरसह विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये करिअरच्या मुबलक संधी आहेत. देशात आणि जागतिक स्तरावर या संधी आगामी काळात विस्तारतच जाणार आहेत,......
पालकांमधून व्यक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सायन्स, डिप्लोमा, अभियांत्रिकी, आर्किटेक्चरसह विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये करिअरच्या मुबलक संधी आहेत. देशात आणि जागतिक स्तरावर या संधी आगामी काळात विस्तारतच जाणार आहेत, असा आशादायी सूर लोकमत, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी), नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळच्या (एनएमव्हीपीएम) चर्चासत्रात प्रा. विजय नवले यांनी व्यक्त केला.
येथील दर्डा मातोश्री सभागृहात सोमवारी आयोजित चर्चासत्रप्रसंगी सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक आणि लेखक, समुपदेशक प्रा.विजय नवले याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. प्रा. विजय नवले यांनी दहावी बारावीनंतरचे विविध करिअरमार्ग, करिअरची अचूक निवड, अभियांत्रिकी आणि विविध व्यावसायिक करिअर या विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले. अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया, पालकांची भूमिका, व्होकेशनल अभ्यासक्रमाचे महत्व या विषयांवर देखील भाष्य केले.
प्रा.नवले म्हणाले, मला एखाद्या क्षेत्रातून काय मिळणार यापेक्षा मी त्या क्षेत्राला काय योगदान देणार, याचा प्रामुख्याने विचार करिअर निवडीत व्हावा. मी कोण होणार यापेक्षा मला काय कार्य करायचे आहे, या अनुषंगाने देखील विचार करावा. शाखा ठरविताना पैसा केंद्रस्थानी ठेवण्यापेक्षा कर्तृत्व केंद्रस्थानी ठेवणे अधिक श्रेयस्कर ठरेल. करिअर निवडीमध्ये आवड, क्षमता आणि पात्रता ही त्रिसूत्री आहे. आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे अथवा जे क्षेत्र मिळाले आहे त्यात आवड निर्माण करावी. एखाद्या करिअर क्षेत्रासाठी अपेक्षित असलेल्या क्षमता आपल्यामध्ये नसतील तर त्या प्रयत्नपूर्वक साध्य कराव्यात. स्कोप हा केवळ कार्यक्षेत्रावर अवलंबून नसतो तर एखाद्या कार्यक्षेत्रातील आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असतो. उद्योजकता आणि संशोधन ही आगामी काळातील महत्वाची कार्यक्षेत्रे असतील.
पुढे नवले म्हणाले, विविध शाखांची माहिती घेऊनच प्रवेशप्रक्रियेला सामोरे जा. बदलत्या तंत्रज्ञानामुळे आगामी काळात अभियंत्यांना जागतिकस्तरावर संधी असतील. कौशल्यावर आधारित व्यावसायिकतेची पदवी उद्योजकतेसाठी उत्तम आहे. अभियांत्रिकी शिक्षणात इंडस्ट्री स्कील आणि इंटर्नशिप असलेला अभ्यासक्रम अधिक उपयोगाचा आहे. चर्चासत्रानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसन केले. या चर्चासत्रास विद्यार्थी पालकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. संचालन प्रा. अजय कोलारकर यांनी केले. संयोजन दीपा खंडारकर यांचे होते.
बी टेकबद्दल वक्ते काय म्हणाले -
नूतनमधील बी टेकच्या कौशल्य केंद्रित अभ्यासक्रमात प्रत्यक्ष कंपनीत जाऊन विद्यार्थ्यांना इंटर्नशिपद्वारे शिकण्याची संधी मिळणार आहे. तांत्रिक क्षेत्रातील परिपूर्ण अनुभवी तज्ज्ञांकडून वर्गात शिकविले जाणार आहे. परदेशी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञानासंदर्भात गुणसंवर्धन करणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण अनिवार्य असल्याने गुणवत्तापूर्ण अभियंते तयार होत आहेत. आगामी काळात सँडविच पद्धतीचे शिक्षणच दर्जेदार काम करणारे अभियंते घडवतील, असे चित्र आहे.
बी व्होकबद्दल वक्ते काय म्हणाले -
सायन्स, कॉमर्स, आर्टस् कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण तसेच डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतो. इथे देखील कौशल्याधिष्ठित शिक्षण मिळणार आहे. तांत्रिकी विषयातील शिक्षण असूनही अवघड वाटणारे गणिती विषय तुलनेने कमी असून, प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव बी व्होक मध्ये मिळतो.
कमी गुण आहेत, प्रवेश परीक्षा दिली नाही, अभियांत्रिकीला प्रवेशास पात्र नाही, कमी कालावधीचा तांत्रिक कोर्स हवा आहे, चांगली नोकरी हवी आहे, पुढे उद्योजक बनायचे आहे, असा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ, नवी दिल्ली यांच्या मान्यतेचा कोर्स नूतन महाराष्ट्र (पुणे)मध्ये करता येईल.
विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या चर्चासत्रास विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी त्यांचे प्रश्न विचारून शंकानिरसन केले. प्रा. नवले यांच्या खुमासदार शैलीमुळे हशा आणि टाळ्यांची दाद लक्षणीय ठरली. मुद्देसूद मांडणी, सद्यस्थितीचा अचूक आढावा, पूरक उदाहरणे आणि नर्मविनोदी वक्तृत्व यामुळे श्रोते चर्चासत्राचा आनंदाने आस्वाद घेऊ शकले. त्यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांची उदाहरणे सांगून उपस्थितांना प्रेरणा दिली. पिंपरी चिंचवड आणि नूतन महाराष्ट्र संस्थेचा माहितीपट पाहताना औद्योगिक परिसराच्या सान्निध्याचा शैक्षणिक सुविधांमध्ये कसा प्रभावी वापर विद्यार्थ्यांंसाठी उपयुक्त ठरतो, याचा अंदाज आला. 'आमच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळाली असून करिअर म्हणजे नेमके काय तेही कळाले. आजच्या या कार्यक्रमामुळे आम्हाला करिअरमध्ये मोठे काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. तर पालकांनी देखील ‘लोकमत‘ चे आभार मानले. कल्पना नसलल्या अनेक करिअर्सची परिपूर्ण माहिती मिळाली, कागदपत्र, प्रवेशप्रक्रिया, शुल्क सवलतीच्या योजनांची माहिती मिळाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
बीई प्रवेशाच्या टिप्स
या वर्षीची प्रवेशप्रक्रिया देखील आॅनलाईन आहे.
तंत्रशिक्षणाच्या डीटीई वेबसाईट वर प्रथम नावनोंदणी करून प्रक्रियेत सहभागी होता येईल.
मेरिट मिळाल्यानंतर पूर्ण विचार करून पर्यायाची यादी करावी.
शाखा निवडताना पुढे नेमके काय करायचे आहे, कामाचे स्वरूप कसे असते, माझी आवड काय यांचा देखील विचार करावा.