खड्डामय रस्त्यांवर वाहनधारकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 05:00 AM2019-11-22T05:00:00+5:302019-11-22T05:00:02+5:30
चाळणी झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. नव्यानेच तयार झालेल्या रस्त्यांवरही खड्ड्यांचा पसारा वाढला आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्यातून जाणाऱ्या प्रमुखसह ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. चाळणी झालेल्या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. नव्यानेच तयार झालेल्या रस्त्यांवरही खड्ड्यांचा पसारा वाढला आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
नेर-अमरावती मार्गावरील कोलुरा ते लोहारा या गावापर्यंत खड्ड्यातून रस्ता शोधावा लागतो. जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यापूर्वी लहान असलेल्या खड्ड्यांनी आता आपला पसारा वाढविला आहे. नेर-बाभूळगाव रस्ता चिखली(कान्होबा) गावापर्यंत जीवघेणा ठरत आहे. खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटून अपघात होण्याची भीती आहे. गतवर्षी मांगलादेवी रस्ता अवघ्या काही दिवसात चकाचक करण्यात आला होता. माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या मांगलादेवी गावाला भेटीनिमित्त या रस्त्याला चांगले दिवस आले होते. मात्र अवघ्या तीन महिन्यात जैसे थे परिस्थिती झाली.
नेर-कारंजा रस्त्याची संपूर्ण ‘वाट’ लागली आहे. सतत वर्दळीचा हा रस्ता आहे. दुचाकीसह अवजड वाहनांची या रस्त्याने गर्दी असते. ग्रामीण भागातील सावरगाव(काळे), पिंपळगाव(काळे), मारवाडी ते वाळकी, वटफळी ते वाळकी, मुकिंदपूर ते पारधी बेडा, सिंदखेड ते ब्राह्मणवाडा, वटफळी-खंडाळा, नेर-पाथ्रड, वाई अशा अनेक रस्त्यावरून मार्ग काढणे कठीण होऊन बसले आहे. खड्ड्यांमुळे शारीरिक त्रास वाढल्याची ओरड आहे.
उखडलेल्या रस्त्यावर पिंपातून डांबर सोडून रोलर फिरविले जाते. त्याचेही प्रमाण अतिशय कमी असते. खड्डा बुजविल्याचे समाधान तेवढे मिळते. वास्तविक खड्ड्यात गिट्टी टाकण्याची गरज आहे. परंतु बहुतांश ठिकाणी मुरूम टाकला जात असल्याची माहिती आहे. या सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दिशादर्शकच नाही
नेर तालुक्यातून जाणाºया अनेक रस्त्यांवर दिशादर्शक नाहीत. आहे ते कोलमडून पडले. त्यामुळे या भागातून जाणाºया नवीन वाहनधारकांना रस्ता शोधणे कठीण जाते. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.