काडतूस तपास १३ शस्त्र परवान्यांवर केंद्रित
By Admin | Published: January 12, 2016 02:11 AM2016-01-12T02:11:49+5:302016-01-12T02:11:49+5:30
हैदराबादच्या तिघांकडून जप्त केलेल्या पिस्तूल-बंदुकांच्या ६० जिवंत काडतुसांचा तपास पोलिसांनी १३ शस्त्र परवान्यांवर केंद्रित केला आहे.
१५ व्यक्तींचे छायाचित्रही जप्त : आरोपींचे लोकेशन मिळाले औरंगाबादमध्ये
यवतमाळ : हैदराबादच्या तिघांकडून जप्त केलेल्या पिस्तूल-बंदुकांच्या ६० जिवंत काडतुसांचा तपास पोलिसांनी १३ शस्त्र परवान्यांवर केंद्रित केला आहे.
हैदराबादचे काडतूस प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पुसदच्या पार्वतीनगरमधील रहिवासी इम्तियाज खॉ सरदार खॉ (२५) याच्या घराची झडती घेतली होती. या झडतीमध्ये तब्बल १३ व्यक्तींच्या नावाने शस्त्र परवाने, १५ व्यक्तींचे पासपोर्ट फोटो, त्यांचे आधारकार्ड, बंदूक साफ करण्याचे साहित्य आढळून आले होते. ते पोलिसांनी जप्त केले आहे. १३ व्यक्तींच्या नावे आढळलेले शस्त्र परवाने खरे की खोटे याचा शोध घेतला जात आहे. संबंधित व्यक्तींच्या दाखविलेल्या रहिवासी पत्यांवर जाऊन सदर व्यक्ती खरोखरच अस्तित्वात आहे की नाही हे तपासले जात आहे.
पोलीस सूत्रानुसार, इम्तियाज खॉ याचा पिता सरदार खॉ यांचे हैदराबादमधील गौस आर्म्स या शस्त्र व दारूगोळा विकणाऱ्या परवाना प्राप्त दुकानासोबत कनेक्शन आहे. सरदार खॉच्या ओळखीतूनच त्याचा मुलगा इम्तियाज खॉ याचीही तेथे ओळख झाली. या गौस आर्म्समधूनच हा दारूगोळा बोलविल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात सदर दुकानात या दारूगोळा पुरवठ्याच्या कोणत्याही नोंदी पोलिसांना आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे परवान्याआड अवैधरीत्या दारूगोळ्याचा पुरवठा केला जात असावा असा संशय पोलिसांना आहे. दारूगोळा पोहोचला याचा अर्थ शस्त्रे आधीच पोहोचली असावी, असा अंदाज पोलीस वर्तवित आहे. जप्तीतील काडतूस हे हत्ती, रोही या सारख्या मोठ्या प्राण्यांना मारण्यासाठी उपयोगी पडत असल्याचे सांगितले जाते. इम्तियाज खॉ हा शस्त्र व दारूगोळ्याचा व्यवसाय केंव्हापासून करतो, त्याच्यामार्फत आतापर्यंत कुणा-कुणाला व कुठे-कुठे पुरवठा झाला याचा शोध घेतला जात आहे. शिवाय पासपोर्ट फोटो असलेले व्यक्ती कोण, शस्त्र परवाना सापडलेल्या व्यक्तींकडे खरोखरच शस्त्रे आहेत का? हे शोधले जात आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास एलसीबी अथवा एसडीपीओकडे दिला जाण्याची शक्यता आहे. सध्या मात्र हा तपास दराटी ठाणेदाराकडे असल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)
पिता-पुत्राची गुन्हेगारी पार्श्वभूमी
जिवंत काडतूस प्रकरणातील मुख्य संशयित इम्तियाज खा व त्याचा पिता सरदार खॉ या दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आहे. सरदार खॉवर चंद्रपूर जिल्ह्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. त्या प्रकरणात तो संचित रजेवरून कारागृहातून पसार आहे. सध्या हे दोघेही बाप-लेक पसार असून मध्यंतरी पोलिसांना त्यांचे लोकेशन औरंगाबादमध्ये मिळाले होते. या लोकेशनचा त्यांच्या अटकेसाठी पोलिसांना फार उपयोग होऊ शकला नाही. हैदराबादवरून काडतूस घेऊन येणारे तीन युवक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.