मृत अभियंत्याची पत्नी असल्याचे सांगणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल; वणीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 03:08 PM2024-01-06T15:08:55+5:302024-01-06T15:09:12+5:30

नोकरी व पैशावर केला होता दावा

Case filed against woman claiming to be wife of deceased engineer; Incidents in the vani | मृत अभियंत्याची पत्नी असल्याचे सांगणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल; वणीतील घटना

मृत अभियंत्याची पत्नी असल्याचे सांगणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल; वणीतील घटना

वणी (यवतमाळ) : मृत झालेल्या एका अविवाहित अभियंत्याची पत्नी असल्याची बतावणी करून अनुकंपावरील नोकरी आणि पैशावर दावा करणाऱ्या तोतया महिलेचे बिंग फुटले आहे. खोटे प्रमाणपत्र सादर करून पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या या महिलेविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात भादंवि १९९, २०१, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा करण्यात आला आहे. मृत अभियंत्याची आई शकुंतला मधुकर कोनप्रतीवार हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.

रशिदा बेगम सय्यद फकरुद्दीन उर्फ सुप्रिया रंगनाथ रुईकर, असे तोतया महिलेचे नाव आहे. चंद्रशेखर मधुकर कोनप्रतीवार असे मृत अभियंत्याचे नाव आहे. तो मूळचा वणी येथील रहिवासी असून, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत होता. या दरम्यान, २० जानेवारी २०२२ला त्याचे हृदयविकाराने निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी वारसाला मिळणाऱ्या कायदेशीर लाभासाठी न्यायालयात वारसा प्रमाणपत्राकरिता अर्ज केला. मात्र, त्याचवेळी या प्रकरणात रशिदा बेगम सय्यद फकरुद्दीन उर्फ सुप्रिया रंगनाथ रुईकर या महिलेने उडी घेतली.

चंद्रशेखरच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या वारसा प्रमाणपत्रावर रशिदाने आक्षेप घेतला. सध्या ही महिला नागपुरात वास्तव्याला आहे. तत्पूर्वी ती वणी येथे वास्तव्याला होती. सन २००७ मध्ये नागपुरातील गणेश टेकडी मंदिरात चंद्रशेखर सोबत लग्न झाले. त्यानंतर चंद्रशेखरपासून दोन मुले झालीत, असा दावा तिने आक्षेप घेताना केला. चंद्रशेखरच्या मृत्यूनंतर नोकरी व इतर आर्थिक लाभावर तिने दावा केला. यासाठी ती न्यायालयात गेली.

असे फुटले महिलेचे बिंग
चंद्रशेखरच्या कुटुंबीयांच्या माहितीप्रमाणे, ही महिला ही वणीतील रंगारीपुरा येथे एका इसमासोबत २०२० पर्यंत राहत होती. त्या इसमापासून तिला दोन मुले झालीत. या मुलांची डिलिव्हरी वणीतीलच एका खासगी रुग्णालयात झाली. याची नोंद चिखलगाव ग्रामपंचायतीमध्ये होती. ही नोंद चंद्रशेखरच्या कुटुंबीयांनी पुरावा म्हणून सादर केला. शिवाय गणेश टेकडी मंदिर येथे कोणत्याही प्रकारचे लग्न होत नाही व आजपर्यंत कोणतेही लग्न येथे झाले नाही, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली. तसेच ज्या तारखेला लग्न झाल्याचा दावा करण्यात आला, त्या तारखेला चंद्रशेखर हा कर्तव्यावर हजर होता. असे विविध पुरावे त्याच्या कुटुंबीयांनी सादर केल्याने तोतया पत्नीचे बिंग फुटले. महिलेचे बिंग फुटताच न्यायालयाने चंद्रशेखरच्या कुटुंबीयांच्या बाजूने निकाल दिला. तसेच तोतया पत्नीवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून वणी पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.

Web Title: Case filed against woman claiming to be wife of deceased engineer; Incidents in the vani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.