प्रेमाचा प्रस्ताव ठेवत मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गुन्हा दाखल होताच आरोपी पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 01:41 PM2022-03-31T13:41:54+5:302022-03-31T13:48:09+5:30
मुलीने घरी जाऊन तिच्या आईजवळ ही माहिती सांगितली. त्यानंतर आईने आरोपी अक्षयला याबाबत विचारणा केली असता त्याने पीडितेच्या आईलाही धमकावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव (यवतमाळ) : पंधरावर्षीय शाळकरी मुलगी मैत्रिणीच्या घरी जेवायला गेली. एकांताचा फायदा घेत आरोपीने या मुलीपुढे प्रेमाचा प्रस्ताव ठेवत तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. ही घटना मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा (पिसगाव) येथे घडली. याप्रकरणी आरोपीवर विनयभंगासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला आहे.
२७ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता गावातील एक १५ वर्षीय शाळकरी मुलगी घराशेजारी राहणाऱ्या मैत्रिणीकडे जेवण करायला गेली होती. जेवण आटोपून ही मुलगी पाणी पिण्यासाठी स्वयंपाक घरात गेली असता मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत तेथे उपस्थित असलेला आरोपी अक्षय रवींद्र गोलर (२४) याने तिच्या मागे जाऊन मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने प्रतिकार करीत त्याला शिवीगाळ केली. हा प्रकार बाहेर सांगितल्यास पाहून घेण्याची धमकीही आरोपीने तिला दिली.
मुलीने घरी जाऊन तिच्या आईजवळ ही माहिती सांगितली. त्यानंतर आईने आरोपी अक्षयला याबाबत विचारणा केली असता त्याने पीडितेच्या आईलाही धमकावले. आरोपीच्या धमकीने दहशतीत असलेल्या पीडितेच्या कुटुंबीयांनी घटनेच्या तीन दिवसांनंतर ३० मार्च रोजी मारेगाव पोलीस ठाण्यात येऊन येऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी अक्षयविरुद्ध भादंवि ३५४, ३५४ अस ५०६, व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध सुरू आहे.
वारंवार घडणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी पालक चिंतेत
शेतकरी आत्महत्या, कुमारी माता अशा घटनांनी अगोदरच मारेगाव तालुका ढवळून निघत असताना आता तालुक्यात वारंवार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पालकवर्ग चिंतीत झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत तालुक्यात अशा प्रकारचे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. वाढती बेरोजगारी, व्यसनाधिनता, मोबाइल, इंटरनेटचा वाढता वापर यातून सामाजिक संस्कार व जबाबदारी याचा विसर नव्या पिढीला पडत चालला आहे. व्याभिचाराकडे आकर्षित होणाऱ्या या पिढीवर मानसोपचाराची गरज निर्माण झाली आहे.