आंदोलनकर्त्यांवर दाखल केले गुन्हे; शेतमालाचे दर घसरल्याने साजरी केली होती काळी दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 05:51 PM2024-11-05T17:51:50+5:302024-11-05T17:54:54+5:30
Yavatmal : शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकाला बाजारात कवडीमोल भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकाला बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. शासनाकडून हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. कापूस व सोयाबीन या पिकांवर मोठ्या प्रमाणात लागवड खर्च झाला आहे. नफा सोडा, हा खर्चही निघणार नाही, अशा दरात शेतमाल खरेदी केली जात आहे. या अन्यायाविरोधात दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असा ठपका ठेवत शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
शेतकरी वारकरी संघटना व इतर शेतकरी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात आले. शेतमालाला सरकारने हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबावी यासाठी प्रतीकात्मक काळी दिवाळी येथे शेतकऱ्यांनी साजरी केली. या आंदोलनाची दखल घेण्याचे सोडून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आचारसंहितेतील फिरत्या पथकाचे प्रमुख प्रकाश वाघमारे यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून शहर पोलिसांनी गुन्हे नोंदविण्याची कारवाई केली.
निवडणूक पथकाची पोलिसात तक्रार
सिकंदर शाह, विजय निवल, अशोक भुतडा, पवन थोटे, प्रवीण कांबळे, बाळासाहेब जीवने, श्रीराम डंगारे, दादाराव घोडे, रामदास शिंदे, दीपक मडसे, अविनाश रोकडे, विश्वनाथ फुपरे, रूशांत पिंपळकर, नारायण अगलधरे, ना.बा. आगलावे, मोरे महाराज, मनोज पाचघरे यांच्यासह १५ जणांविरुद्ध कलम २२३ भारतीय न्याय संहिता, सहकलम ३७ (१), १३५ महाराष्ट्र पोलिस कायदा या नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.