शिक्षकांची जात पडताळणी आता तालुक्यातच
By admin | Published: August 17, 2016 01:22 AM2016-08-17T01:22:47+5:302016-08-17T01:22:47+5:30
शिक्षकांच्या जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने १७ आॅगस्ट रोजी यवतमाळात विशेष शिबिर आयोजित केले होते.
तारखेतही बदल : सर्व संघटनांच्या दबावानंतर जिल्हा परिषद प्रशासनाचा दिलासा
यवतमाळ : शिक्षकांच्या जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने १७ आॅगस्ट रोजी यवतमाळात विशेष शिबिर आयोजित केले होते. मात्र, सर्वच शिक्षक संघटनांकडून विरोध झाल्यानंतर आता हे शिबिर १७ ऐवजी शनिवारी २० आॅगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, शिबिर यवतमाळऐवजी तालुकापातळीवरच घेण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे.
बिंदू नामावलीसाठी मागास प्रवर्गातून नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, व उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार आहे. १७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्वच म्हणजे आठ हजार शिक्षकांना त्यासाठी यवतमाळात बोलावण्यात आले. मात्र, सलग सुट्यांच्या हंगामात हे शिबिर नको, म्हणत शिक्षक संघटनांनी विरोध केला. ज्या दिवशी शिबिराचा आदेश निघाला, त्याच दिवशी म्हणजे १४ आॅगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला यांच्याशी प्रत्यक्ष किंवा फोनवरून संपर्क साधला. साहेबराव पवार, दिवाकर राऊत, ज्ञानेश्वर नाकाडे, राजू सूर्यवंशी, किरण मानकर, गजानन देऊळकर, पुरुषोत्तम ठोकळ, रमाकांत मोहरकर, राजेंद्र जोगमोडे, कैकाडे आदींचा यात समावेश होता. यावेळी झालेल्या चर्चेत तपासणी शिबिराची तारीख बदलण्याची मागणी केली. तसेच जिल्हा पातळीवर एकाच दिवशी आठ हजार शिक्षकांचे शिबिर घेतल्यास नियोजन कोलमडण्याची भीतीही व्यक्त केली. त्याची दखल घेत सीईओंनी २१ आॅगस्ट रोजी प्रमाणपत्र तपासणीचे आश्वासन दिले. मात्र, याच दिवशी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी अमरावती येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना जातप्रमाणपत्र पडताळणीला उपस्थित राहणे अशक्य असल्याचे सीईओ आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. संघटनांचा दबाव बघता अखेर २० आॅगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली. विशेष म्हणजे, आता हे शिबिर सोळाही पंचायत समिती स्तरावरच घेण्यात येणार आहे. त्यासाठी यवतमाळातून कक्ष अधिकारी पाठविण्यात येणार आहे. शिवाय, ज्यांना २० आॅगस्ट रोजीच्या तालुका पातळीवरील शिबिरातही उपस्थित राहणे अशक्य होईल, त्यांनी नंतर यवतमाळात येऊन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभाही देण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)