अन्नसाखळी तुटल्याने वन्यजीव हिंस्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:30 PM2018-09-27T22:30:45+5:302018-09-27T22:31:07+5:30
टिपेश्वर अभयारण्य व परिसरातील जंगलात वास्तव्य करून तृणभक्षी प्राण्यांवर गुजराण करणाऱ्या वाघांची अन्नसाखळी तुटल्यानेच ते हिंस्र बनले आहेत. त्यातूनच ते मानव आणि पाळीव प्राण्यांवर सातत्याने हल्ले करत असल्याचे मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
संतोष कुंडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : टिपेश्वर अभयारण्य व परिसरातील जंगलात वास्तव्य करून तृणभक्षी प्राण्यांवर गुजराण करणाऱ्या वाघांची अन्नसाखळी तुटल्यानेच ते हिंस्र बनले आहेत. त्यातूनच ते मानव आणि पाळीव प्राण्यांवर सातत्याने हल्ले करत असल्याचे मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. राळेगाव तालुक्यातील जंगलामध्ये बछड्यांसह वास्तव्याला असलेल्या नरभक्षी वाघिणीकडून झालेल्या हल्ल्यामागेही हेच कारण असल्याचे वन्यजीव अभ्यासकांना वाटते. यातूनच मानव आणि वन्यजीवांत संघर्षाची ठिणगी पडल्याचे मानले जाते.
पूर्वी टिपेश्वर अभयारण्य व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर तृणभक्षी प्राण्यांची संख्या होती. त्यात ससे, हरिण, सांबर, रोही यासारख्या प्राण्यांचा समावेश आहे. या प्राण्यांची शिकार करून वाघ आपली गुजराण करतो. वर्षभरात एक वाघ किमान ५० प्राण्यांची शिकार करतो. हे प्राणी जंगलाबाहेर जाऊ नये, त्यांची अन्नसाखळी तुटू नये, यासाठी वनविभागाकडून कुरण विकास योजना राबविली जाते. त्यासाठी लाखो रूपयांचा निधी येतो. परंतु या योजनेची प्रभावी अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाही. केवळ कागदोपत्रीच ही योजना राबविली जात असल्याने वन्यजीवांचे अस्तित्वच आता धोक्यात आले आहे. टिपेश्वर अभयारण्य व परिसरातील ‘प्री बेस लाईन’ (खाद्य पुरवठ्याची साखळी) संपत आली आहे. परिणामी तृणभक्षी प्राणी सैरभैर झाले आहेत.
मागील दोन वर्षांत या तृणभक्षी प्राण्यांनी जंगलाबाहेर जाणेच पसंद केले आहे. शेतशिवारात तूर, पºहाटीचे उत्पादन घेतले जाते. या प्राण्यांनी या पिकांना आपले टार्गेट केले. खाद्याच्या शोधात तृणभक्षी प्राणी जंगलाबाहेर पडल्याने त्यांच्या मागोमाग वाघही जंगलाबाहेर पडले. सध्या राळेगाव तालुक्यातील जंगलात बछड्यांसह भटकत असलेली वाघिणदेखिल तृणभक्षी प्राण्यांच्या मागावर जंगल सोडून बाहेर गेली, असे वन्यजीव अभ्यासकांना वाटते. राळेगाव परिसरात जुने प्रादेशिक जंगल आहे. तसेच तेथे लपण्यासाठी पुरेसे आडोसेदेखील आहेत. त्यामुळे ही वाघिण त्याच परिसरात रमली. या भागात रानडुकरांची संख्या मोठी असून त्यांचा आकार मोठा आहे. त्यामुळे वाघिणीला सहज खाद्य मिळाले. परिणामी अद्यापही ही नरभक्षी वाघिण त्याचठिकाणी वास्तव्याला आहे.
या वाघिणीने आतापर्यंत १४ जणांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे नागरिक प्रचंड भयग्रस्त आहे. या वाघिणीला जेरबंद करण्याची योजना वनविभागाने आखली असली तरी तिच्यासोबत असलेल्या तिच्या बछड्यांचे काय, हा प्रश्न वन्यजीव अभ्यासकांना अस्वस्थ करीत आहे. सदर नरभक्षी वाघिणीला बछड्यांसह बेशुद्ध करून सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे उभे ठाकले आहे.
सरकारी व्यवस्थेचा हस्तक्षेप वाढला
टिपेश्वर अभयारण्यातून वन्यजीव बाहेर पडण्याचे आणखी एक कारण सांगितले जाते. या जंगलात मोठ्या प्रमाणावर सरकारी हस्तक्षेप वाढला आहे. सन २०१३-१४ मध्ये जवळपास वर्षभर जेसीबीद्वारे टिपेश्वर अभयारण्यात खोदकाम करण्यात आले. जेसीबीचा भलामोठा आवाज आणि मानवी वावर, यामुळे वन्यजीव सैरभैर झाले व जंगलाबाहेर निघून गेले, असा वन्यजीवपे्रमींचा अंदाज आहे.
वन्यजीव जंगलामध्ये सुरक्षित राहावे, असे वाटत असेल तर सर्वप्रथम जंगलातील अन्नसाखळी वाढविणे गरजेचे आहे. टिपेश्वर अभयारण्यासह परिसरातील प्रादेशिक जंगलातील कुरण मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले आहे. कुरण वाढविण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागतो. परंतु त्यामुळे अनेक वर्षासाठीची वन्यजीवांसाठी अन्नाची तजविज होऊ शकते.
-प्राचार्य धर्मेंद्र तेलगोटे,
वन्यजीव अभ्यासक