भाजीपाल्याच्या शेतात सोडली गुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:01 AM2018-03-22T00:01:05+5:302018-03-22T00:01:05+5:30
शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाजीमंडीत कवडीमोल भाव आहे. बाजारापर्यंत भाजीपाला नेण्याचा वाहतूक खर्चही निघत नाही. परिणामी महागाव तालुक्याच्या बिजोरा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाजीपाल्याच्या शेतात गुरे सोडली आहे.
सदानंद लाहेवार।
ऑनलाईन लोकमत
बिजोरा : शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाजीमंडीत कवडीमोल भाव आहे. बाजारापर्यंत भाजीपाला नेण्याचा वाहतूक खर्चही निघत नाही. परिणामी महागाव तालुक्याच्या बिजोरा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भाजीपाल्याच्या शेतात गुरे सोडली आहे. शासनाच्या उदासीन धारेणामुळे शेतकरी देशोधडीस लागला असताना आता बागायती शेतकरीही त्याच वाटेवर आहे.
महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बागायती शेतकरी केली जाते. खरीप हंगामात काहीही उरले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भाजीपाला लावला आहे. टोमॅटो, वांगे, फुलकोबी, पानकोबी, काकडी, पालक, सांभार, वाल आदी पालेभाज्याला लावल्या आहे. परंतु या भाज्यांनासध्या बाजारात भावच नाही. कोबीच्या एका कट्ट्याला २५ ते ३० रुपयेच मिळत आहे. पालकाला तर कुणी हातही लावत नाही. टोमॅटो चिल्लर बाजारात दहा रुपयाला दीड किलो मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल कुणी घेत नाही. दूरच्या बाजारपेठेत भाजीपाला पाठवावा तर वाहतूक खर्चही निघत नाही. लावलागवड, बियाणे, फवारणी यासह तोडणीची मजुरी असा प्रचंड खर्च शेतकऱ्यांला करावा लागत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आता गुरे सोडली आहे. जनावरांना चारा तरी होईल, अशी आशा आहे.
शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा
अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब केवळ भाजीपाल्यावर चालविले जाते. नगदी पैसे हातात येत असल्याने कोणतीही अडचण जात नाही. परंतु यावर्षी भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे. त्यामुळे घर खर्च चालवावा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. भाजीपाल्यातून समृद्धीच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे.