वणीत कापसाच्या गंजीखाली दबून सीसीआय पर्यवेक्षकाचा मृत्यू
By admin | Published: January 14, 2015 11:15 PM2015-01-14T23:15:58+5:302015-01-14T23:15:58+5:30
तालुक्यातील आबई फाटा येथील साई जिनींग अॅण्ड प्रेसिंग फॅक्टरीत कापसाच्या गंजीखाली दबून सीसीआयचे (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडीया) पर्यवेक्षक नरेंद्रकुमार रामप्रसाद रावत यांचा मृत्यू झाला.
वणी : तालुक्यातील आबई फाटा येथील साई जिनींग अॅण्ड प्रेसिंग फॅक्टरीत कापसाच्या गंजीखाली दबून सीसीआयचे (कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडीया) पर्यवेक्षक नरेंद्रकुमार रामप्रसाद रावत यांचा मृत्यू झाला. शिरपूर पोलिसांनी याप्रकरणी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.
तालुक्यातील आबई फाटा येथे साई जिनींग अॅण्ड प्रेसिंग जीन आहे. या जिनींगमध्ये दररोज शेकडो क्विंटल कापूस खरेदी केला जातो. याच जिनींगमध्ये सीसीआयतर्फेही कापूस खरेदी सुरू आहे. सीसीआयचे पर्यवेक्षक म्हणून तेथे मूळ उत्तरप्रदेशातील प्रतापदेहड येथील रहिवासी नरेंदक्रुमार रामप्रसाद रावत (२१) कार्यरत होते. सोमवारी १२ जानेवारीला त्यांची रात्रपाळीत ड्युटी होती. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ते कामावर गेले होते. त्यांची ड्युटी मंगळवारी सकाळी संपणार होती. मंगळवारी सकाळी ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली. दरम्यान मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जिनींगमधील कापसाच्या एका गंजीखाली त्यांचा मृतदेहच आढळला. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. याबाबत शिरपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.
जिनींगमधून कापसाच्या गंजीतून प्रेसिंगसाठी कापूस जातो. अशाच एका गंजीजवळ नरेंद्रकुमार कदाचित पहुडले असावे, असा कयास वर्तविण्यात येत आहे. दरम्यान त्यांना झोप लागली असावी आणि प्रेसिंगसाठी कापूस जात असताना त्यांच्या अंगावर कापसाची गंजी खचली असावी, असाही कयास वर्तविण्यात येत आहे. कापसाच्या त्या गंजीखाली दबून गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला. (कार्यालय प्रतिनिधी)