सीसीटीव्ही बंद, खबऱ्यांचा खर्चही खिशाला परवडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2022 10:40 PM2022-09-25T22:40:31+5:302022-09-25T22:40:55+5:30
सीसीटीव्ही बंद असल्याने एकही गुन्हा उघडकीस आलेला नाही. शिवाय चोरटेही सतर्क झाले असून सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस आपली ओळख पटवतील या भीतीने चोरटे पूर्ण चेहरा झाकूनच चोरी करताना अनेक फुटेजमध्ये आले आहे. या कारणाने या चोरट्यांपर्यंत पोहोचणे पोलिसांना कठीण होत आहे. परंपरागत खबरे आता परवडेनासे झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात गुन्हेगारी वाढली आहे. रस्त्यावर गुन्हे घडतात. वाटमारी होते. यासह चोरी-घरफोडीही सातत्याने सुरू आहे. दुचाकी चोर तर बेफाम झाले आहेत. या चोरांना शोधण्यासाठी लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे पाच वर्षांपासून बंद आहे. मुळात कॅमेरे लावण्यातच अनियमितता झाल्याचा आरोप होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांना आपल्या परंपरागत खबऱ्यांच्या नेटवर्कवरच अवलंबून राहावे लागत आहे.
सीसीटीव्ही बंद असल्याने एकही गुन्हा उघडकीस आलेला नाही. शिवाय चोरटेही सतर्क झाले असून सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस आपली ओळख पटवतील या भीतीने चोरटे पूर्ण चेहरा झाकूनच चोरी करताना अनेक फुटेजमध्ये आले आहे. या कारणाने या चोरट्यांपर्यंत पोहोचणे पोलिसांना कठीण होत आहे. परंपरागत खबरे आता परवडेनासे झाले आहेत.
यवतमाळातील सीसीटीव्ही नावाला
सुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र यात मोठा भ्रष्टाचार झाला. सदोष कॅमेरे लागले. त्यामुळे या कॅमेराच्या मदतीने एकही गुन्हा उघडकीस आला नाही.
चोरट्यांची नजर सीसीटीव्हीवरच
चोर चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरे कुठे आहेत याची रेकी करतात. या कॅमेऱ्याची दिशा बदलवून कॅमेरा तोडून नंतर चोरीचा डाव साधला जातो. त्यामुळे चोरांपर्यंत पोहोचण्यात उपयोग होत नाही.
खबऱ्यांचा खर्च परवडेना
खबऱ्यांच्या भरवश्यावर गुन्हे उघड आणण्याचे प्रमाण ठरते. अनेक पोलीस-कर्मचारी अधिकारी स्वत:चे स्वतंत्र नेटवर्क उभारतात.
आता खबऱ्यांकडून मोठी डिमांड केली जात आहे. दारू, मटनासोबतच रोख पैसेही खबरे मागत आहेत. त्याशिवाय बोलण्यास तयार होत नाही.
पैसे माेजूनही होते फसवणूक
गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती मिळविण्यासाठी खबऱ्यांना जवळ केले जाते. बहुतांश वेळ खबऱ्या माहिती देण्यापूर्वी मोठी टीप असल्याचे सांगत पैसे मागतात. प्रत्यक्ष कारवाईत मात्र फारसे काही हाती लागत नाही. यामुळे पैसे माेजूनही पोलिसांची खबऱ्यांकडून फसवणूक होत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.
सीसीटीव्ही फुटेज असूनही चोर ओळखणे कठीण
शहरातील मेन लाईनमध्ये चोरी करतानाचे चोर सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये आले आहे. स्पष्ट दिसत असूनही चोरांची ओळख पटविताच आली नाही.
चोरही झाले शिरजोर. सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत हे गृहित धरूनच गुन्हा करताना चोरटे चेहरा पूर्णत: झाकून घेतात. इतकेच काय शारीरिक हालचाली ही बदलतात.