पार्सल दरोड्याने सीसीटीव्हीची पोलखोल
By admin | Published: November 3, 2014 11:32 PM2014-11-03T23:32:03+5:302014-11-03T23:32:03+5:30
भरदिवसा एका कुरिअर सर्व्हिसच्या प्रतिनिधीला घातक शस्त्राचा धाक दाखवून पार्सल पळविण्यात आले. या घटनेची एकच चित्रफित दहा तज्ज्ञांकडून तपासूनही बोलेरो वाहनाचा क्रमांक मात्र अद्यापही दिसलेला नाही.
यवतमाळ : भरदिवसा एका कुरिअर सर्व्हिसच्या प्रतिनिधीला घातक शस्त्राचा धाक दाखवून पार्सल पळविण्यात आले. या घटनेची एकच चित्रफित दहा तज्ज्ञांकडून तपासूनही बोलेरो वाहनाचा क्रमांक मात्र अद्यापही दिसलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी लाखो रुपये खर्च करून शहरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते.
गौरव भिमजीयानी रा. धामणगाव रेल्वे असे कुरिअर लंपास झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. धामणगाव येथून एसटी बसने तीन ते चार कुरिअर आणि पार्सल घेऊन त्याची खेप पोहोचविण्यासाठी तो यवतमाळात आला होता. बोलेरो वाहनातून आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने स्टेट बँक चौकात एक पार्सल लंपास केले. ही घटना स्टेट बँक चौकात पोलिसांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या शिवाय एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही ती टिपल्या गेली आहे. पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील चित्रफित ही अस्पष्ट आहे. या उलट संबंधित घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रफित स्पष्ट आली आहे. मात्र त्यामध्ये बोलेरो वाहनाचा क्रमांक दिसून येत नाही. धामणगाव रेल्वे येथून ही बोलेरो निघाली होती. घटनेच्या दिवशी एका पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे वाहन टिपल्या गेले आहे. या दोन्ही चित्रफिती शहरातील अनेक खासगी संगणक तज्ज्ञांकडे नेण्यात आल्या. मात्र अद्यापही क्रमांकाची उकल झालेली नाही. गुन्हेगारी रोखण्याचा बागुलबुवा करीत दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून यवतमाळ शहरात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले. योग्य क्षमतेचे कॅमेरे खरेदी न करता थातूरमातूर आणि दर्जाहीन कॅमेऱ्यांची खरेदी झाली. त्यामुळे हे कॅमेरे निव्वळ शोभेची वस्तू ठरत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)