राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती घरातच साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:51 AM2021-04-30T04:51:49+5:302021-04-30T04:51:49+5:30
पुसद : मानवतेचे महान पुजारी, ग्रामगीता निर्माते, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती अर्थात ग्रामजयंती कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, ...
पुसद : मानवतेचे महान पुजारी, ग्रामगीता निर्माते, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती अर्थात ग्रामजयंती कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, ३० एप्रिल रोजी घरूनच साजरी करण्याचे आवाहन गुरुदेव सेवा मंडळाने केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिन अर्थात ग्रामजयंती महोत्सव दरवर्षी ३० एप्रिल रोजी उत्साहात साजरा केला जातो. मात्र, कोरोनामुळे हा सोहळा डॉक्टर, नर्सेस, पोलीस, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आदी सेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यापुरता मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प येथील गुरुदेव सेवा मंडळाने केला. मंडळातर्फे स्थानिक देशमुख नगरमधील जिजामाता चौकातील सामुदायिक प्रार्थनास्थळी राष्ट्रसंतांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षी भव्य प्रमाणात साजरा केला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने यंदाही ग्रामजयंती सोहळा प्रत्येक घरा-घरातून राष्ट्रसंत लिखित विजयी संकल्प गीत
‘तन-मन-धनसे सदा सुखी हो,
भारत देश हमारा’, या राष्ट्रवंदनेचे गायन करून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
ग्रामजयंती सोहळा ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता दीप प्रज्वलित करून संपूर्ण कुटुंबीयांसह प्रत्येकाने घरातच राहून साजरा करण्याचे आवाहन गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे,
उपाध्यक्ष नंदकुमार पंडित, मनोहर बनस्कर, कार्याध्यक्ष प्रा. नंदकुमार खैरे, सचिव ॲड. गजानन साखरे, पांडुरंग बुरकुले, प्रमोद जयस्वाल, दशरथ सूर्यवंशी, सुरेश कदम, माधव जाधव, किसनराव गरडे, नरेश ढाले, यशवंत देशमुख,
प्रकाश कदम, अनिल भावसार, ज्ञानेश्वर सुरडकर, साहेबराव राठोड, राजेंद्र काळबांडे, गजानन दाभाडे, वसंत काळीकर आदींनी केले आहे.