बाबासाहेबांच्या विचारांचा उत्सव साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:22 PM2018-04-10T23:22:53+5:302018-04-10T23:22:53+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त पेन उचलला आणि भारताचा इतिहास बदलला. बाबासाहेबांनी भारतीय समाजाला चिकित्सेसोबतच विज्ञानवादी धर्म शिकविला.

 Celebrate the views of Babasaheb | बाबासाहेबांच्या विचारांचा उत्सव साजरा करा

बाबासाहेबांच्या विचारांचा उत्सव साजरा करा

googlenewsNext
ठळक मुद्देविवेक मोरे : पुसदच्या धम्मक्रांती प्रज्ञापर्वातील तृतीय पुष्प

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त पेन उचलला आणि भारताचा इतिहास बदलला. बाबासाहेबांनी भारतीय समाजाला चिकित्सेसोबतच विज्ञानवादी धर्म शिकविला. त्यांना व्यक्तीपूजा अथवा व्यक्तीस्तोम मान्य नव्हते. अनुयायांनी बाबासाहेबांच्या जयंतीचे अवडंबर न करता त्यांच्या समाजोधारक विचारांचा उत्सव साजरा करावा, असे आवाह मुंबई येथील उठाव साहित्य मंचचे अध्यक्ष विवेक मोरे यांनी येथे केले.
स्थानिक महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात ‘आंबेडकरी चळवळीची दशा व दिशा’ या विषयावर ते तृतीय पुष्प गुंफताना बोलत होते. अध्यक्षस्थानी पुसदचे उपवनसंरक्षक अरविंद मुंडे होते. यावेळी राजेश आसेगावकर, प्रदीप ढबाले, ए.सी. कांबळे, संजय कांबळे, प्रमोद सोनटक्के उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदर्शनगर येथील धम्मचक्र महिला मंडळाच्यावतीने बुद्धवंदना सादर करण्यात आली.
विवेक मोरे म्हणाले, ‘फुल्यांनी काढल्या शाळा, बाबासाहेब काढलं कॉलेज, आमचं मात्र आज, सगळं वाया गेलं नॉलेज’ सद्यस्थितीत बाबासाहेबांचे अनुयायी त्यांच्या विचारांशी फारकत घेऊन आचरण करीत आहे. बाबासाहेबांच्या जयंती दिनी डिजेच्या तालावर तरुणाई थिरकते हे सर्व बंद झाले पाहिजे. १४ एप्रिल हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोपात उपवनसंरक्षक अरविंद मुंडे यांनी आयएफएस कसा झालो याचा सविस्तर प्रवास कथन केला. मनुष्य पैशाने नव्हे तर विचाराने गरीब असल्याचे प्रतिपादन केले. सुरुवातीला ‘भीम जयंती साजरी करू’ या समूहनृत्याचे सादरीकरण करण्यात आले. लोकहित शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेश खडसे यांच्यातर्फे पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले. संचालन नरेंद्र पाटील यांनी, आभार दीपक मेश्राम यांनी मानले. यावेळी प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष सुरज वरठी, प्रा. विलास भवरे, प्रा. कल्याण साखरकर, गणेश वाठोरे आदी उपस्थित होते.

Web Title:  Celebrate the views of Babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.