क्षमापन दिवस एकाच दिवसी साजरा व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:48 PM2018-10-05T23:48:50+5:302018-10-05T23:50:01+5:30
जैन समाजात क्षमापन दिवस साजरा करण्याची एक तारीख नाही. समाजातील काही लोकांमध्ये असलेल्या मतभेदातून यासाठी आजपर्यंत एकमत होऊ शकलेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : जैन समाजात क्षमापन दिवस साजरा करण्याची एक तारीख नाही. समाजातील काही लोकांमध्ये असलेल्या मतभेदातून यासाठी आजपर्यंत एकमत होऊ शकलेले नाही. परंतु किमान धार्मिक कार्यासाठी तरी समाजातील लोकांनी एकत्र आले पाहिजे, अशी अपेक्षा लोकमतचे यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी व्यक्त केले.
कळंब येथे छ.ग.प्रवर्तक प.पू.गु. रतनमुनिजी म.सा. यांच्या सहवासात सुरु असलेल्या चार्तुमास कार्यक्रमाच्यानिमित्त आयोजित नवकार जाप समारोह समापन कार्यक्रमात किशोर दर्डा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी प.पू.गु. रतनमुनिजी म.सा., सतीशमुनीजी म.सा., शुक्लमुनिजी म.सा., रमनमुनिजी म.सा., आदित्यमुनिजी म.सा. यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पुढे बोलताना किशोर दर्डा म्हणाले, भगवान महावीर जयंतीची शासकीय सुट्टी दिली जाते. परंतु क्षमापन दिवसाची अजुनही सुट्टी जाहीर झालेली नाही. यासाठी समाजातील अनेक पंथीय लोकांमध्ये असलेले मतभेद कारणीभूत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. परंतु आता लोकांनी एकत्र येत एकमेकांसोबत बंधुभाव ठेवला पाहीजे, अशी सार्थ अपेक्षा व्यक्त केली.
किशोर दर्डा म्हणाले, आपण कल्पनाही करु शकत नाही, इतकी मोठी शक्ती नवकार मंत्रात आहे. नवकार मंत्रात मानव कल्याणाचे सामर्थ्य आहे. कळंबचे रहीवाशी मोठे भाग्यशाली आहे, त्यांना इतक्या मोठ्या उंचीच्या संताचा सहवास मिळातो आहे. लहानपणापासूनच गुरुदेवांच्या सानिध्यात राहण्याची संधी मला मिळाली, हे माझे परम भाग्य आहे. त्यासोबतच गुरुदेवांची वाणी घराघरात पोहचविण्याचे संधी लोकमतच्या माध्यमातून आम्हाला मिळाली, याचा मोठा आनंद आहे, असेही किशोर दर्डा म्हणाले.
यावेळी पारसमल दुगड (आर्णी), स्वरुपचंद बोथरा (वर्धा), रतनलाल सुराणा, महेंद्र बोथरा (कुंभा), डॉ.सारिका शहा, पंकज भंडारी (वणी) आदींची उपस्थित होती. यावेळी नेहा सुरेश बोथरा यांचे ११ तर ज्योत्स्रा रविंद्र कोठारी यांच्या ९ उपवासाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन वर्षा तातेड व अंजु नागडा यांनी तर आभार धर्मेश कोठारी यांनी मानले.