अंत्यसंस्कार होताच स्मशानभूमीचा स्लॅब कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:29 AM2021-07-18T04:29:38+5:302021-07-18T04:29:38+5:30
पुसद : तालुक्यातील निंबी येथे अंत्यसंस्कार पार पडताच स्मशानभूमीचा स्लॅब काेसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. निंबी येथील ...
पुसद : तालुक्यातील निंबी येथे अंत्यसंस्कार पार पडताच स्मशानभूमीचा स्लॅब काेसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
निंबी येथील रुखमाबाई साहेबराव हराळ या महिलेचे शनिवारी सकाळी निधन झाले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रुखमाबाई यांची अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेत नातेवाइकांसह गावकरी सहभागी झाले होते. सर्व जण वाशीम रोडवरील स्मशानभूमीत पोहोचले. परंपरेनुसार अंत्यविधी पार पडला. अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडताच भडाग्नी दिल्यानंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांनी अचानक स्मशानभूमीच्या शेडचा स्लॅब कोसळला. यामुळे एकच खळबळ उडाली होती.
निंबी ग्रामपंचायत हद्दीत शेडच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्यामुळे स्लॅब कोसळल्याची चर्चा गावकरी करीत होते. मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्या ग्रामपंचायतीवर गटविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बॉक्स
हे शेड सन २०१२-१३ मध्ये जनसुविधा योजनेंतर्गत बांधण्यात आले असून, त्याला बऱ्याच वर्षांपासून तडे गेले होते. त्यामुळे नागरिकांनी या शेडवर दहनविधी करू नये, असे नागरिकांना सांगितले होते, अशी माहिती सरपंच मयूर राठोड यांनी दिली. या शेडभोवती बांबूचे कठाडेसुद्धा लावले होते. परंतु काहींनी ते चोरून नेले. या शेडच्या बाजूलाच टिनाच्या शेडमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.