जयहिंद चौकातील शतकोत्तरी राम जन्मोत्सव
By admin | Published: April 4, 2017 12:06 AM2017-04-04T00:06:10+5:302017-04-04T00:06:10+5:30
येथील श्रीराम जन्मोत्सवाला शतकोत्तर परंपरा आहे. यवत नावाचे गाव असतानाच जयहिंद चौकात हा उत्सव सुरू झाला.
यवतमाळ : येथील श्रीराम जन्मोत्सवाला शतकोत्तर परंपरा आहे. यवत नावाचे गाव असतानाच जयहिंद चौकात हा उत्सव सुरू झाला. या उत्सवाने १२१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. राम जन्मोत्सवाची शोभायात्राही याच ठिकाणावरून निघणार आहे.
झिबलाजी कृष्णाजी नव्ही यांनी १८९६ मध्ये जयहिंद चौकातील राम मंदिर पूर्णत्वास आणले. या मंदिराचा संपूर्ण सभामंडप दगडाचा आहे. छतही दगडाचे आहे. सभामंडपाच्या छतावरील कोरीव काम सुबक आणि देखणे आहे. १९ व्या शतकामध्ये या मंदिराचे संस्थानामध्ये रूपांतर झाले. त्यावेळी या मंदिराचे काम स्व. परशराम पाटील यांनी पाहिले. त्यानंतर जिरकर आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी बाबाराव राऊत यांनी अखेरपर्यंत काम पाहिले. स्वातंत्र्यपूर्व काळात या मंदिरात स्वातंत्र्य संग्रामाच्या आंदोलनाची दिशा ठरत होती. गांधी चौक आणि राम मंदिरातून आंदोलनाची दिशा ठरविण्याचे काम त्या काळात घडले. यामध्ये स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा, दादासाहेब राऊत, बाबाराव राऊत, नानासाहेब मुडे, चंपालाल मोहता यांच्यासह अनेक स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा समावेश होता. पूजेची जबाबदारी तत्कालीन पुजारी भानुदास औदार्य यांच्यावर सोपविण्यात आली होती. पुजाऱ्याची राहण्याची व्यवस्था मंदिरातच करण्यात आली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मंदिराचे अध्यक्ष बाबाराव राऊत यांनी काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात सभामंडपासह अनेक जिर्णोद्धाराची कामे झाली. विद्यमान अध्यक्ष रत्नाकर राऊत आहे. या मंदिराच्या परिसरात बरीच जागा आहे. सभामंडपाचे बांधकाम आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह इतर सोई करण्यासाठी संस्थान काम करीत आहे.
१२१ वर्षे जुने मंदिर
सर्वात जुने मंदिर म्हणून या मंदिराला ओळखले जाते. यामुळे रामजन्मोत्सवाची शोभायात्रा या ठिकाणावरून निघण्याची परंपरा राहिली आहे. यावर्षी राम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.