मध्यवर्ती बँकेच्या विशेष लेखापरीक्षणाचे निर्देश; बँकेच्या संशयित व्यवहाराची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 06:15 PM2024-10-11T18:15:33+5:302024-10-11T18:16:18+5:30
Yavatmal : संशयास्पद व्यवहाराची होणार चौकशी अहवालासाठी सात दिवसांची मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जवाटप, वसुली, सस्पेन्स खाते, विजयराव चव्हाण यांच्या खात्यामध्ये कोट्यवधी रुपये कसे आले?, अशा अनेक प्रकरणांत बँकेच्या संशयित व्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अशोक बाबर व माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव देशमुख खडकेकर यांनी शासनाकडे केली होती. तक्रारदारांनी दाखल केलेल्या प्रकरणात विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी जिल्हा विशेष लेखापरीक्षक जगदीश गवळे यांची नियुक्ती केली. ४ ऑक्टोबर रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महागाव तालुक्यातील हिवरा संगम शाखेतील कोट्यवधी रुपयांच्या कर्ज प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर मध्यवर्ती बँकेच्या एकूणच कर्ज वाटप व्यवहारातील दोषी आढळून आलेल्या ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर यापूर्वीच निलंबन आणि फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. मध्यवर्ती बँकेच्या संशयित व्यवहाराची चौकशी करण्यासाठी विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी जिल्हा विशेष लेखापरीक्षकांची नियुक्ती केली. सात दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. बँकेच्या मागील पाच आर्थिक वर्षांमध्ये (२०१९-२० ते २०२३-२४) संशयित खात्यांमध्ये झालेले आर्थिक व्यवहार, मागील पाच आर्थिक वर्षांमध्ये (२०१९- २० ते २०२३-२४) विविध कार्यकारी संस्थांचे बँकेसोबत झालेले आर्थिक व्यवहार, बँकेने व्यापारी संकुलाला दिलेल्या कर्जाची प्रकरणे, विजय चव्हाण यांच्या व त्यांच्याशी संबंधित बँकेतील सर्व खात्यांची तसेच या खात्यावरून इतर खात्यावर झालेल्या व्यवहारांची तपासणी, १९ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या बँकेच्या कर्ज समितीच्या बैठकीत मंजूर व वितरित करण्यात आलेली कर्जे, या मुद्यांवर चौकशीची मागणी करण्यात आली होती.
स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवालाचे निर्देश
मुद्यांची सखोल छाननी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सात दिवसात सादर करावा, असे निर्देश अमरावतीचे विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी दिले आहे. या आदेशानुसार बँकेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. लवकरच चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे, अशी माहिती तक्रारदार पंजाबराव देशमुख खडकेकर यांनी दिली आहे.
"अशोक बाबर आणि पंजाबराव देशमुख यांची चौकशीची मागणी आहे. यावर चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी दिले आहे. अजून चौकशी सुरू झाली नाही."
- अरविंद देशपांडे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक, यवतमाळ.