सीईओ जेव्हा विद्यार्थ्यांचा घेतात क्लास..! सावरगडच्या शाळेला भेट
By अविनाश साबापुरे | Published: April 12, 2024 04:12 PM2024-04-12T16:12:35+5:302024-04-12T16:14:22+5:30
गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना केले आवाहन.
अविनाश साबापुरे, यवतमाळ : सकाळी सात वाजता शाळा भरली... गुरुजी शिकवित असतानाच अचानक सीईओ मंदार पत्की यांनी शाळेत धडक दिली. गुरुजींची तारांबळ उडाली, तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन सर आले म्हणून आनंद पसरला... तर समोर निरागस मुले पाहून सीईओंनी पटकन् खडू उचलला अन् फळ्यापुढे जाऊन विद्यार्थ्यांचा ‘क्लास’ सुरू केला... ‘साहेबां’चे शिकविणे पाहून गुरुजींही आनंदून गेले...
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या दोन हजारांवर शाळा आहेत. यातील ९० टक्केपेक्षा अधिक शाळा खेड्यात तर अनेक शाळा दुर्गम भागात आहेत. या शाळा आणि तेथील विद्यार्थी गुणवत्तेत कमी पडू नये यासाठी सध्या प्रशासन विविध प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून १२ एप्रिलला सावरगड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला सीईओ मंदार पत्की (आयएएस) यांनी अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. इंग्रजी विषयाचे वाचन, संख्यावरील क्रिया व खेळ आदींबाबत पत्की यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी हितगुज साधत अध्यापनाचा प्रत्यक्ष आनंद घेतला. या अध्यापनाने केवळ विद्यार्थीच नव्हेतर शिक्षकही चार्ज झाले. सीईओ मंदार पत्की यांनी आनंददायी अध्यापनाचा कृतीतून धडा दिला, अशी प्रतिक्रिया शिक्षकांतून उमटली.
यावेळी सीईओंनी शाळेतील पिण्याच्या पाण्यासह परिसर स्वच्छता, शौचालय स्वच्छता व विद्यार्थ्यांची गुणवत्ता आदी बाबींची तपासणी केली. तसेच उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी सीईओंसह यवतमाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, गटशिक्षणधिकारी पोपेश्वर भोयर, विस्तार अधिकारी नलिनी वंजारी, पंचायत विस्तार अधिकारी अरुण भोयर, केंद्र प्रमुख सारंग भटुरकर, मुख्याध्यापक विकास झाडे, राजहंस मेंढे आदी उपस्थित होते.