अध्यक्षांच्या आदेशाला सीईओंकडून केराची टोपली

By Admin | Published: July 25, 2016 12:47 AM2016-07-25T00:47:11+5:302016-07-25T00:47:11+5:30

आर्णी तालुक्यातील तळणी येथील मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यालय बोरगाव (दाभडी) येथे काही दिवसांपूर्वी स्थलांतरण करण्यात आले.

CEO's chair kerachi basket | अध्यक्षांच्या आदेशाला सीईओंकडून केराची टोपली

अध्यक्षांच्या आदेशाला सीईओंकडून केराची टोपली

googlenewsNext

बँक स्थलांतरण प्रकरण : एक महिन्यापासून तळणीतील व्यवहार ठप्प
तळणी : आर्णी तालुक्यातील तळणी येथील मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यालय बोरगाव (दाभडी) येथे काही दिवसांपूर्वी स्थलांतरण करण्यात आले. गावकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर तळणीची बँक शाखा तळणीतच कायम ठेवण्याचा आदेश देण्यात आला. मात्र, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि विभागीय सहनिबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक यांनीसुद्धा तसे आदेश दिले होते. मात्र, या आदेशांना जिल्हा बँकेच्या सीईओंनी केराची टोपली दाखविली आहे.
कोणतेही कारण नसताना व कोणालाही पूर्वसूचना न देता तळणीतील बँक शाखेचे स्थलांतरण झाले. परंतु या निर्णयाला गावकरी तसेच अध्यक्षांसह काही संचालकांनी हरकत घेतली. सदर बाब चुकीची असल्याची कबुली त्यांनी दिली. गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सहनिबंधक कार्यालय तसेच मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयावरसुद्धा मोर्चा नेला होता. सदर मोर्चाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांनी तळणी येथील बँक शाखा पूर्ववत सुरू राहणार असल्याचे आश्वासन दिले होते. मनीष पाटील यांनी दिलेल्या या आश्वासनाचे गावातील सर्वच लोकांकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर सदर बँकेचे स्थलांतरण रद्द करण्याचे आदेश जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. शिवाय विभागीय सहनिबंधक तसेच जिल्हा उपनिबंधक यांनीसुद्धा अशाच प्रकारचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते.
परंतु वरिष्ठांच्या आदेशाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. जवळपास एक महिना उलटूनही सदर बँकेतील बॅटऱ्या, यूपीएस, डिश छत्री आदी साहित्य अजूनही तळणी येथील बँकेत आणून देण्यात आलेले नाही. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून बँकेचे व्यवहार प्रभावीत झालेले आहे. वीज पुरवठा गेल्यावर तळणी बँक शाखेतील सर्व व्यवहार ठप्प होत आहे. बँक प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. बँकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे सर्व भार एकाच व्यक्तीवर येवून पडला आहे. त्यामुळे नवीन खाते उघडणे, रोख रक्कम जमा करणे, पीक विमा योजनेचे पैसे आणि बँकेचे इतर सर्व व्यवहार मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे.
तळणी परिसरात बँकेचे खातेदार मोठ्या प्रमाणात आहेत. या ग्राहकांच्या सुविधेसाठी ही बँक तळणी येथे पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी परिसरातील लोकांकडून केली जात आहे. अध्यक्षांसह वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर बँक प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (वार्ताहर)

 

Web Title: CEO's chair kerachi basket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.