निष्क्रिय ग्रामसेवकांना ‘सीईओं’नी फटकारले
By admin | Published: February 27, 2015 01:36 AM2015-02-27T01:36:48+5:302015-02-27T01:36:48+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी येथील पंचायत समितीच्या सभागृहात विविध विकासकामांचा आढावा घेतला.
कळंब : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी येथील पंचायत समितीच्या सभागृहात विविध विकासकामांचा आढावा घेतला. कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकांना त्यांनी चांगलेच फटकारले. हलगर्जीपणा आणि हयगय यापुढे खपऊन घेतली
जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
जलयुक्त शिवार अभियान, स्वच्छ भारत अभियान, वृक्ष लागवड, इंदिरा आवास घरकूल योजना, कॅशबुक अपडेट करणे, मागासक्षेत्र अनुदान विकास निधी आदी विभागातील कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अनेक ग्रामसेवकांनी पूर्ण केले नाही, याविषयी त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. शौचालय बांधकामाचा वेग वाढवा. त्यासाठी महिला बचत गटाची मदत घ्या. गावात मुक्काम करा, असे आदेशही त्यांनी दिले.
अपूर्ण घरकुलाचे बांधकाम तत्काळ पूर्ण करा, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेली कामे, सूक्ष्म नियोजन प्रक्रिया याचीही माहिती त्यांनी घेतली. लावलेली जास्तीत जास्त वृक्ष जिवंत कसे राहतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पंचायत समितीमार्फत होणाऱ्या कामांची त्यांनी ग्रामपंचायतनिहाय आढावा घेतला.
यावेळी गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, शाखा अभियंता तुषार परळीकर, अशोक कयापाक, विस्तार अधिकारी अशोक ठाकरे, रमेश केळकर, कृषी अधिकारी किशोर अंबरकर, पंकज बरडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)