४० हजार शाळांच्या मूल्यवर्धन संकल्पपूर्तीचा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 03:23 PM2019-07-25T15:23:23+5:302019-07-25T15:24:54+5:30
शांतीलाल मुथा फाऊंडेशनने विकसित केलेला मूल्यवर्धनाचा कार्यक्रम राज्यशासन शाळांमध्ये राबवित आहे. आता या मूल्यवर्धनाच्या संकल्पपूर्तीचा अनोखा सोहळा पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये विद्या प्राधिकरणाने आयोजित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शांतीलाल मुथा फाऊंडेशनने विकसित केलेला मूल्यवर्धनाचा कार्यक्रम राज्यशासन शाळांमध्ये राबवित आहे. आता या मूल्यवर्धनाच्या संकल्पपूर्तीचा अनोखा सोहळा पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये विद्या प्राधिकरणाने आयोजित केला आहे. राज्यभरातील शाळांच्या या प्रदर्शनाला मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांसह १० हजार प्रेक्षक भेट देणार आहे.
येत्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा सोहळा होणार आहे. शांतीलाल मुथा फाऊंडेशनने विकसित केलेला मूल्यवर्धन कार्यक्रम गेल्या चार वर्षापासून शाळांनी यशस्वी करून दाखविला. २१५ तालुक्यातील ४० हजार शाळांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला आहे. उर्वरित शाळांमध्येही येत्या तीन महिन्यात मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्यानिमित्त होत असलेल्या प्रदर्शनात प्रत्येक जिल्ह्यासाठी एक विशेष स्टॉल राखून ठेवण्यात आला आहे. या स्टॉलमध्ये जिल्ह्यातून निवडलेल्या उत्कृष्ठ पोस्टर्सचे प्रदर्शन भरविले जाणार आहे.विशेष म्हणजे हा स्टॉल फक्त मराठी शाळांसाठीच राखीव असेल. तर उर्दू, इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या शाळांचेही स्वतंत्र दालन राहणार आहे.
यासंदर्भात विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक विकास गरड यांनी शिक्षणाधिकाऱ्यांंना पत्र पाठवून सर्व शाळांना सहभागी करण्याबाबत सूचना दिली आहे. पोस्टर्ससाठी जवळपास ३२ विषय देखील सूचविले आहे. या प्रदर्शनातील पोस्टर्सचा भविष्यकाळातील पाठ्यपुस्तकांसाठी उपयोग होण्याची शक्यता आहे. शिवाय या समारोहाच्या निमित्ताने ‘मी आणि मूल्यवर्धन’ हे पुस्तकही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित केले जाणार आहे. त्यात शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांचे मूल्यवर्धनाशी संबंधित अनुभव मांडले जाणार आहे. या पुस्तकासाठी अनुभव लिहून पाठविण्याचे आवाहन विद्या प्राधिकरण आणि शांतीलाल मुथा फाऊंडेशनने केले आहे.