प्रमाणपत्र वाटपाची चौकशी

By admin | Published: April 15, 2017 12:22 AM2017-04-15T00:22:29+5:302017-04-15T00:22:29+5:30

मारेगाव येथील एका विशिष्ट सेतू केंद्राकडून वितरित करण्यात आलेले विविध प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Certificate allocation inquiry | प्रमाणपत्र वाटपाची चौकशी

प्रमाणपत्र वाटपाची चौकशी

Next

दाखल्याविनाच प्रमाणपत्र : मारेगाव तहसीलदारांना मागितला खुलासा
वणी : मारेगाव येथील एका विशिष्ट सेतू केंद्राकडून वितरित करण्यात आलेले विविध प्रमाणपत्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या सेतू केंद्रावर तहसीलदारांची असलेली विशेष मर्जी यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा आहे. यामुळे आता खुद्द तहसीलदारच अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात मारेगाव येथील विशाल मनोहर किन्हेकर यांनी थेट वणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत तहसीलदारांना लेखी स्वरूपात खुलासा मागविला आहे.
मारेगाव येथील तहसील कार्यालय परिसरात आशिष विजय येरणे यांचे महा-ई सेवा केंद्र आहे. या केंद्रातूनच विना दाखल्याने प्रमाणपत्र वितरीत केल्याची तक्रार विशाल किन्हेकर यांनी एसडीओकडे केली आहे. महा-ई सेवा केंद्रातून आॅनलाईन पद्धतीने दाखले दिले जातात. या दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्याशिवाय हे प्रमाणपत्र देता येत नाही. असे असताना येरणे याच्या महा-ई सेवा केंद्रातून अशा आवश्यक कागदपत्राविनाच प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गंभीर बाब ही की, उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक असताना तसे कागदपत्रे न जोडताही संबंधित महसूल अधिकाऱ्याने सदर प्रमाणपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या कशा, ही बाबही आता चौकशीच्या कक्षेत आहे.
सेतू केंद्रातून कोणतेही आवश्यक प्रमाणपत्र मिळविण्यासाठी संबंधित अर्जदाराला त्याच्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक असते. अर्ज प्राप्तीनंतर सेतू केंद्र संचालक कागदपत्रांची तपासणी करून महा आॅनलाईन या पोर्टलवर सदर कागदपत्रे अपलोड करतो. त्यानंतर संबंधित महसूल अधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव जातो. महसूल अधिकाऱ्याने कागदपत्रांची तपासणी करूनच त्यावर डिजीटल स्वाक्षरी करावी, अशी एकूण पद्धत आहे. मात्र मारेगाव येथील आशिष येरणे याच्या सेतू केंद्रातून या पद्धतीला तिलांजली देण्यात आली आहे. याची सखोल चौकशी केल्यास मोठे गौडबंगाल उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असून यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगण्यात येते. त्यात काही महसूल अधिकारीही गुंतले असल्याची चर्चा आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

तहसीलदारांकडून १५ दिवसानंतरही उत्तर नाही
विशाल किन्हेकर यांनी आशिष येरणे याच्याविरुद्ध उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मिश्रा यांनी यासंदर्भात मारेगावचे तहसीलदार विजय साळवे यांना ३१ मार्च रोजी पत्र देऊन पाच दिवसांच्या आत स्पष्टीकरणासह खुलासा मागितला. मात्र साळवे यांनी १५ दिवस लोटूनही या विषयात एसडीओंकडे खुलासा सादर न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

Web Title: Certificate allocation inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.