सिझरिनच्या महिला रुग्ण, बाळांवर चक्क जमिनीवर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 06:18 PM2019-07-11T18:18:59+5:302019-07-11T18:19:06+5:30
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती वॉर्डात सिझरिन झालेल्या महिला तसेच त्यांच्या नवजात बाळांवर चक्क जमिनीवर झोपवून उपचार सुरू आहेत.
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसूती वॉर्डात सिझरिन झालेल्या महिला तसेच त्यांच्या नवजात बाळांवर चक्क जमिनीवर झोपवून उपचार सुरू आहेत. गुरुवारी हा प्रकार उघडकीस आला. वैद्यकीय महाविद्यालयात क्र.७ व ८ हा प्रसूती वॉर्ड आहे. तेथे महिलांची प्रचंड गर्दी आहे. उपलब्ध खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या अधिक झाल्याने जागेअभावी दोन खाटांच्या मधल्याभागी गाद्या टाकून सिझरिनच्या महिलांवर उपचार केले जात आहेत.
नवजात बाळांनाही तेथेच खाली जमिनीवर बेडवर ठेवले जात आहे. या बाळांच्या बेडच्या आजूबाजूला मुंग्या, माकोडे फिरत असल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी दुपारी संकल्प फाऊंडेशनचे सदस्य आकाश भारती यांच्या निदर्शनास आला. त्यांच्याकडून माहिती मिळताच फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार, रवी माहुरकर, मनिष इसाळकर, विनोद नराळे, गोलू डेरे हे कार्यकर्ते रुग्णालयात दाखल झाले. बाजूचा वॉर्ड क्र.६ रिकामा असताना महिला रुग्णांना तेथे का हलविले जात नाही या मुद्यावर त्यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार यांना जाब विचारला. त्यानंतर डॉ. श्रीगिरिवार यांनी विभाग प्रमुख चव्हाण यांना सूचना दिल्या व वॉर्ड क्र.७, ८ मधील जमिनीवर उपचार सुरू असलेल्या महिला रुग्णांना वॉर्ड क्र.६ मध्ये हलविण्यास सांगितले. तेथेही बेड कमी पडल्यास वेळप्रसंगी एका बेडवर दोन रुग्ण ठेवावे, मात्र महिला व बाळांवर जमिनीवर ठेवून उपचार करू नये, अशा सूचना अधिष्ठातांनी दिल्या.
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण तपासणीसाठी येतात. लगतच्या वाशीम, नांदेड, माहूर, आदिलाबाद, अमरावती या जिल्ह्यातून रुग्णांची मोठी गर्दी होते. त्यातील किमान १०० रुग्ण रोज उपचारार्थ दाखल होतात. महाविद्यालयाची क्षमता लक्षात घेता येथे खाटांची संख्या नेहमीच कमी पडते. पावसाळ्यामध्ये सहसा साथीच्या आजाराच्या रुग्णांची प्रचंड गर्दी होत असल्याने अनेकदा एका बेडवर दोन रुग्ण किंवा जमिनीवर गाद्या टाकून रुग्णांवर उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर येते. परंतु आता नवजात बाळांवरही जमिनीवर उपचार केले जात असल्याने रुग्णाचे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.