अट्टल सोनसाखळी चोराला केले जेरबंद
By सुरेंद्र राऊत | Published: May 2, 2023 07:54 PM2023-05-02T19:54:25+5:302023-05-02T19:54:55+5:30
त्यावर तपास केंद्रीत करून पोलिस आरोपीच्या दिग्रस येथील घरापर्यंत पोहोचले.
सुरेंद्र राऊत, यवतमाळ : दारव्हा, आर्णी आणि यवतमाळ शहरात सोनसाखळी चोरीचे गुन्हे करणाऱ्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले. सोमवारी आर्णी व दारव्हा येथे दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून या चोरट्याने पळ काढला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास पथक गठित करीत तीन शहरातील १०० सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज चेक केले. त्यामध्ये एमएच-२७-सीपी-७१४६ ही स्पोर्ट बाईक आढळून आली. त्यावर तपास केंद्रीत करून पोलिस आरोपीच्या दिग्रस येथील घरापर्यंत पोहोचले.
गब्बर शाह मजीद शाह (२४) रा. शहापूर ता. दिग्रस असे या आरोपीचे नाव आहे. त्याने संपूर्ण जिल्ह्यातच सोनसाखळी चोरीचे गुन्हे केले आहे. यातील बहुतांश गुन्हे उघडकीस येण्याची अपेक्षा पोलिसांना आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ६ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश केला. आर्णी ठाणेदार श्याम सोनटक्के व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख प्रदीप परदेशी हे या गुन्ह्यांचा तपास करीत आहे. या कारवाईत उपनिरीक्षक गजानन अजमिरे, विजय चव्हाण, अरुण पवार, संतोष गावंडे, नफीस शेख, ऋषिकेश इंगळे, मनोज चव्हाण, अरविंद जाधव, योगेश संकुलवार, मिथून जाधव, सहायक पोलिस निरीक्षक गणेश वनारे हे सहभागी झाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"