चैतालीचे गाव जिल्हा परिषदेला दत्तक
By admin | Published: January 14, 2016 03:25 AM2016-01-14T03:25:04+5:302016-01-14T03:25:04+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी बुधवारी मोझर गावाला भेट दिली.
सीईओंचा पुढाकार : आंदणात शौचालय मागणारी स्वच्छतादूत
नेर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी बुधवारी मोझर गावाला भेट दिली. आंदणात शौचालय मागून महाराष्ट्राची स्वच्छतादूत बनलेली मोझरची सून चैताली राठोड (माकोडे) हिच्याशी संवाद साधून त्यांनी विकासासाठी या गावाला दत्तक घेत असल्याचे जाहीर केले.
चैताली राठोड हिने पित्याला आंदणात रेडिमेड शौचालय मागितले. स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या चैतालीची कीर्ती सुलभ इंटरनॅशनल संस्थेकडे दिल्लीला पोहोचली. तिला दिल्लीला बोलाविणे आले. तिथे तिचे सन्मान झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्राची स्वच्छतादूत म्हणून तिला सन्मानित करण्यात आले. मात्र या कुटुंबाला आजही विविध प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित केले. याची दखल जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, गटविकास अधिकारी पी.आर. राठोड, विस्तार अधिकारी किशोर सरफ, स्वच्छ भारत मिशनचे महेंद्र गुल्हाने, राहुल देशमुख, मुकुंद येवतकर, ग्रामसेवक संजय परळीकर आदींनी चैताली व देवेंद्र माकोडे या दाम्पत्याची भेट घेतली. वृक्ष रोपटे देवून चैतालीला सन्मानित केले.
यावेळी सरपंच पूजा साखरवाडे, उपसरपंच उघडे यांच्याशी चर्चा करून गावाला विकासापर्यंत नेण्याच्या उपाययोजनेबाबत मंथन केले. गावाला संपूर्ण हागणदारीमुक्त करून घराघरात शौचालय बांधण्याचा संकल्प सीईओ कलशेट्टी यांनी सोडला. यावेळी सीईओंच्या हस्ते तीन शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)