गोवंश तस्करीविरोधात चक्काजाम
By admin | Published: July 23, 2016 12:08 AM2016-07-23T00:08:44+5:302016-07-23T00:08:44+5:30
गोवंध तस्करीविरोधात लगतच्या पिंपळखुटी येथे हिंदू रामसेना, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले.
राष्ट्रीय महामार्ग ठप्प : हिंदू रामसेना, बजरंग दल, विहिंपचा सहभाग
पाटणबोरी : गोवंध तस्करीविरोधात लगतच्या पिंपळखुटी येथे हिंदू रामसेना, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांसह मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
गोवंश बंदी कायदा महाराष्ट्र शासनाने लागू करूनही गोवंश भरलेली वाहने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरून कत्तलीसाठी हैद्राबादकडे जात असल्याचे दिसून येते. या वाहनांना सामाजिक संघटना तथा पोलिसांनी कित्येकदा पकडलेसुद्धा आहे. आत्तापर्यंत अंदाजे १५ ते २० कारवायासुद्धा झाल्या. यावरून राष्ट्रीय महामार्गाने मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होत असल्याची बाब स्पष्ट होत आहे. पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या निर्देशानुसार नाकाबंद करण्यात आली असली तरी काही अधिकाऱ्यांमुळे गोवंश तस्करी सुरू असल्याचा आरोप यावेळी हिंदू रामसेनेने केला. त्यामुळे पोलीस अधिक्षकांनी चौकशी पथक नेमून अतिशिघ्र कारवाई करावी, अशी मागणी बजरंग दल व राम सेनेने केली आहे. गोवंश तस्करांचा पाठलाग करताना कित्येकदा तस्करांकडून गोभक्तांच्या वाहनाला धडक दिली जाते. यात जिवीतहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय महामार्गावरून होणारी जनावरांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात फोफावली असून गोधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याची दखल घेत हिंदू रामसेना, बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरविले. त्यानुसार पिंपळखुटी येथे दुपारी १२ वाजता हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष तिरूपती कंदकुरीवार, हिंदू रामसेनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर अल्लुरवार, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष रूपेश शर्मा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप धवने, बजरंग जिल्हा आखाडाचे संयोजक सचिन पारोजवार, शिवसेना शहर प्रमुख प्रभाकर येरमे, भाजपा शहराध्यक्ष गजानन शिंगेवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गजानन पुल्लीवार, विनोद वकील, गजू राजूलवार, शहारूख खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान पोलिसांनी या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. (वार्ताहर)
नाकाबंदीदरम्यान नऊ जनावरांची सुटका
पांढरकवडा : केळापूर येथील फिक्स पॉर्इंटजवळ करण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान कत्तलीसाठी जाणाऱ्या सात गायी व दोन कालवडींची पोलिसांनी शुक्रवारी पहाटे सुटका केली. याप्रकरणी चौैघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप मांजरसे हे नाकाबंदी करीत असताना ट्रक क्रमांक टी.एस.१६-यु.ए.७९८६ मध्ये जनावरे नेत असल्याची त्यांना शंका आली. हा ट्रक बाजूला घेऊन त्याची पाहणी केली असता, आतमध्ये सात गायी व दोन कालवडींना अतिशय निर्दयीपणे हातपाय बांधून असल्याचे आढळून आले. या गायीची पोलिसांनी ट्रकमधून सुटका केली. या गायीची किंमत एक लाख ८२ हजार असून८ ट्रकची किंमत सहा लाख रूपये आहे. असा एकूण सात लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वाहनचालक मोहम्मद अमरूद्दीन मोहम्मद नसरूद्दीन (३०) रा.पेरडीकोट, जि.निजामबाद (तेलंगणा), प्रकाश तेलंगे (२५) रा.हुसा, ता.नायगाव (नांदेड), कोरल्ला गंगारेड्डी (५०) रा.पडगलल (तेलंगणा), रंजीत शंकर नामुला (३२) रा.बोदेपेल्ली (तेलंगणा) असे अटकेतील तस्करांची नावे आहेत. (शहर प्रतिनिधी)