रेती माफियांचे प्रशासनाला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 09:58 PM2019-03-10T21:58:16+5:302019-03-10T21:58:45+5:30
तालुक्यात गेल्या काही वर्षांत अनेक रेती माफीया सक्रिय झाले. प्रशासन कठोर कारवाई करीत नसल्याने त्यातील अनेक मुजोर झाले. या माफियांचे समूळ उच्चाटन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
के.एस. वर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : तालुक्यात गेल्या काही वर्षांत अनेक रेती माफीया सक्रिय झाले. प्रशासन कठोर कारवाई करीत नसल्याने त्यातील अनेक मुजोर झाले. या माफियांचे समूळ उच्चाटन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
राळेगाव तालुक्यात १५ रेती घाट आहे. यावर्षी त्यातील एकाही घाटाचा अद्याप लिलाव झाला नाही. त्यामुळे रेती चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. शासकीय संपत्तीची खुले आम लूट सुरू आहे. इतर तालुक्यात वेळोवेळी कठोर कारवाई झाल्या. त्या तुलनेत तालुक्यात मवाळ कारवाई झाल्या. त्यामुळे या माफियांची हिम्मत वाढली आहे. गतवर्षी सात रेती घाटांतून शासनाला रॉयल्टीपोटी पाच कोटी रुपयांचा महसूल मिळाला. याशिवाय वेळोवेळी केलेल्या कारवाईतून दीड-दोन कोटी रुपयांचा दंड प्राप्त झाला.
या भागात रेती घाट लिलावात घेऊन वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील घाटातून रेती उपसा करण्याच्या प्र्रकरणात तेथील महसूल विभागाने लाखो रुपये दंड ठोठावला होता. एका रेती घाटाच्या ठिकाणी पोकलॅडवरथेट गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यातच खळबळ उडाली होती. रेती तस्करीतून मालामाल झालेल्यांनी स्वत:चे मजबूत नेटवर्क उभारले आहे. रेती तस्करी प्रकरणात पाच पट दंड ठोठावण्यावर कारवाई मर्यादित स्वरुपाच्या राहिल्या. काही मोजके अपवाद वगळता वाहन जप्ती, पोलीस ठाण्यात गुन्हे, आरटीओकडे प्रकरणे कारवाईसाठी देणे आदी कठोर उपाय टाळण्यात आल्याने रेती तस्कर निर्धास्त आहे.
रेती चोरट्यांकडून महसूल विभाग दंड वसुलीनंतर जप्तीतील वाहन परत करताना वैयक्तीक जात मुचलका (बाँड) लिहून घेत राहिले. हेच चोरटे वारंवार महसूल विभागास रेती चोरताना आढळून आल्यावर वैयक्तीक जात मुचलक्यातील अटी भंगप्रकरणी कारवाई झाली नाही. महसूल विभागाच्या दंडाच्या व शिक्षेच्या नोंदवहीत वाहन क्रमांकच लिहिले जात नसल्याने चोरट्यांचे फावत राहिले. अनेक ठिकाणचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्या कुटुंबातील सदस्य रेती तस्करीत गुंतले आहे. त्यांच्यावर अपात्रतेसारखी कठोर कारवाई होण्याची गरज आहे.
रेकॉर्डवरील चोरट्यांची नावे समोर आणा
रेती घाट एकदाही लिलावात घेतला नसताना विना क्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्रकद्वारे दिवस-रात्र रेती चोरीच्या भरवशावर तस्करांनी माया गोळा केली. नवीन ट्रॅक्टर, ट्रक, जंबो ट्रक, जेसीबी, पोकलॅड, आलिशान आरामदायी वाहने घेतली. वेळोवेळी या तस्करांची वाहने पकडली गेली. त्यांच्यावर कारवाईही झाली. अशांची नावे महसूल विभागाने समोर आणून किमान याच चेहऱ्यावर लक्ष केंद्रीत केले, तर तस्करीला आळा बसू शकतो.