‘मंडी’च्या मुसक्या बांधण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:20 PM2018-02-23T23:20:41+5:302018-02-23T23:20:41+5:30
खुनातील फरार आरोपीवर आर्णीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे यवतमाळचे गुन्हेगारी वर्तुळ ‘टाईट’ झाले आहे. या फायरिंगची गुंडांमध्ये दहशत आहे.
राजेश निस्ताने ।
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : खुनातील फरार आरोपीवर आर्णीत पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे यवतमाळचे गुन्हेगारी वर्तुळ ‘टाईट’ झाले आहे. या फायरिंगची गुंडांमध्ये दहशत आहे. तर गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीसही आर्णीतील फायरिंगची पुनरावृत्ती करण्याच्या मानसिकतेप्रत आले आहेत. परंतु राजकीय आश्रय लाभलेल्या मंडी टोळीच्या सदस्यांच्या मुसक्या बांधण्याचे आव्हान पोलीस अधिकाºयांना पेलणार काय? याकडे यवतमाळकरांचे लक्ष लागले आहे.
यवतमाळची वाढती गुन्हेगारी, त्यातील एका गटाला असलेला राजकीय आश्रय, त्यातूनच घडणाºया अनेक घडामोडींवर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला. त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. पोलिसांनी आता अचानक आपल्या कामात गती निर्माण केली आहे. अग्नीशस्त्रे, अंमली पदार्थ तस्करीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. खाकी वर्दीतील पोलीस कधी नव्हे तेवढ्या मोठ्या संख्येने शहराच्या विविध भागात दिसू लागल्याने गुन्हेगारांची गती मात्र मंदावली आहे. दत्त चौकात भरदिवसा झालेल्या खुनाच्या घटनेने पोलीस यंत्रणा चांगलीच हादरली होती. त्यातच आर्णीत पोलिसांनी या खुनातील फरार आरोपीवर गोळी झाडली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी क्राईम मिटींगमध्ये ‘बदमाशांना लाठी, गुंडांना गोळी’ असे आदेश ठाणेदारांना दिले. त्यामुळे यवतमाळ पोलीस गोळीबारही करू शकतात, याची जाणीव झाल्याने गुन्हेगारी वर्तुळ काहीसे हादरले आहे. त्यातच पोलिसांनी देशीकट्टे, रिव्हॉल्वर बाळगणाºयांवर लक्ष केंद्रीत केल्याने त्यांची कोंडी झाली आहे.
मंडीच्या कार्यक्षेत्रात पोलिसांच्या एन्ट्रीची प्रतीक्षा
पोलिसांनी अग्नीशस्त्राचा साठा असू शकतो, अशा संशयावरुन शहराच्या विविध भागात कोम्बींग आॅपरेशन सुरू केले आहे. अनेक ठिकाणची शस्त्रे हाती लागली आहे. मात्र ही कारवाई करताना दुजाभावही केला जात आहे. पोलीस शहराच्या विविध भागात अग्नीशस्त्रांचा शोध घेत असले तरी अद्याप मंडी टोळीचे वर्चस्व असलेल्या रहिवासी क्षेत्रात पोलिसांची एन्ट्री झालेली नाही. त्या भागात शिरुन घरझडती घेण्याचे धाडस पोलीस दाखवू शकतात का? याकडे शहराच्या नजरा लागल्या आहेत. राजकीय आश्रयात वावरणाºया मंडी टोळीच्या सदस्यांना शस्त्रमुक्त करण्याचे खरे आव्हान पोलिसांपुढे आहे. पोलिसांनी राजकीय दबाव झुगारुन हे आव्हान लिलया पेलल्यास यवतमाळ पोलीस कुणालाही वठणीवर आणू शकतात, याचा विश्वास जनतेत निर्माण होणार आहे. ‘फायरिंग फेम’ अधिकाºयासह स्थानिक गुन्हे शाखा, एसपींची विविध पथके मंडीला धडा शिकविसाठी आणखी किती वेळ पूर्वतयारी करतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
कर्तव्यदक्षता सिद्धतेचा खरा निकष
मंडी टोळीच्या सदस्यांवरील कारवाईनेच स्थानिक गुन्हे शाखा, टोळीविरोधी पथक, एसपींची विविध पथके, डीबी स्कॉड, संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी यांची कर्तव्यदक्षता सिद्ध करणे शक्य होणार आहे. अन्यथा मंडीला संरक्षण, इतरांवर निशाणा असा संदेश पोलीस प्रशासनाबाबत समाजात जाण्यास वेळ लागणार नाही. अग्नीशस्त्रांबाबत पारदर्शक कारवाई न झाल्यास ‘आर्णीत गोळी नेमकी का झाडली’ याच्या ‘रहस्या’ची पोलीस दलात सुरू असलेली चर्चा जनतेतही उघडपणे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुंडांनी घेतला घरात आश्रय
आतापर्यंत सर्रास देशीकट्टा कंबरेला लावून फिरणाºयांची अडचण निर्माण झाली. कट्टा लावून बाहेर निघाल्यास पोलिसांची भीती आणि कट्ट्याशिवाय निघाल्यास स्पर्धक टोळीकडून जीवाला भीती, अशा दुहेरी संकटात हे गुंड सापडले आहेत. त्यामुळे कित्येकांनी घराबाहेर निघणे बंद केल्याची माहिती आहे.
पोलीस अनभिज्ञ नाहीतच!
यवतमाळ शहरात कोण्या भागात किती अग्नीशस्त्रे (पिस्तूल-रिव्हॉल्वर आदी) असू शकतात याचा अंदाज बांधणे पोलिसांसाठी कठीण नाहीच. गुन्हेगारी वर्तुळात नेटवर्क असलेल्या तमाम पोलिसांपैकी कुणीही या शस्त्रसाठ्यांबाबत अनभिज्ञ नाही. असे असताना कारवाईसाठी एवढी प्रतीक्षा का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सहा पिस्तूल सोडणारे पोलीस कोण ?
वडगाव येथे एका धाडी दरम्यान नुकतेच सहा देशीकट्टे पकडण्यात आले होते. परंतु कट्टे बाळगणारे मटका-जुगार व्यवसायातील दिग्गज असल्याने व ‘लाभाचे नियमित वाहनारे पाट बंद होऊ नये’ म्हणून पोलीस त्यांच्यावर ‘मेहेरबान’ झाले. शस्त्रासह त्यांना सोडून देण्यात आल्याची चर्चा आहे. गोळीबाराने हादरलेल्या गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांना मात्र या सापत्न वागणुकीमुळे पोलिसांकडे बोट दाखविण्याची आयतीच संधी मिळत आहे. शस्त्रे सोडूण देणार हे नेमके पोलीस कोण? हे शोधण्याचे आव्हाण पोलीस प्रशासनापुढे आहे.