बेंबळाच्या पाण्याला ‘मे’चे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:26 PM2018-04-06T23:26:55+5:302018-04-06T23:26:55+5:30
बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळात मे महिन्यात आणने प्रशासनापुढे तगडे आव्हान आहे. या योजनेच्या कामाची आजची स्थिती आणि गती पाहता झालेली घोषणा फोल ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहे.
विलास गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळात मे महिन्यात आणने प्रशासनापुढे तगडे आव्हान आहे. या योजनेच्या कामाची आजची स्थिती आणि गती पाहता झालेली घोषणा फोल ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पाणी येण्याच्या तारखा जाहीर करताना वास्तव नजरेआड केले जात असल्याचे दिसून येते. टाकलेल्या पाईप लाईनच्या किलोमीटरची प्रत्यक्ष स्थिती अंधारात ठेवली आहे. शिवाय जॅकवेल, फाऊंडेशन, सम्प ही कामे मजबूत होण्यासाठी लागणारा अवधी गृहीत धरला असावा की नाही, हा सुध्दा संशोधनाचा विषय आहे. प्रस्तुत प्रतिनिधीच्या प्रत्यक्ष पाहणीतील हे वास्तव आहे.
प्रकल्पावरील जॅकवेलपासूनच जवळपास १०० मीटरपर्यंत पाईप टाकायचे आहे. रस्ता, शेतातून मार्ग काढत निघालेली एक हजार मीमी व्यासाची पाईप लाईन राणीअमरावती गावात थांबली. या ठिकाणी नदीतून मार्ग काढायचा आहे. अनेक गावांचा मार्ग फोडायचा आहे. ब्रेक झालेली लाईन गळव्हा गावापर्यंत पोहोचली. बहुतांश लाईन शेतातून गेली. बेंबळाच्या लघु कालव्याच्या काठाकाठाने लाईन काढताना मूळ मार्गात थोडा बदलही करावा लागला. एका शेतात बेंड करून दिशा बदलवीली गेली. तेथून भिसनी गावाकडे निघालेली पाईपलाईन टाकताना जेसीबीसुध्दा हरला. या भागात खोदकाम करताना अक्षरश: ब्लास्टिंग करावे लागले. पुढे कालवा आणि नाल्याशी सामना करावा लागला. टाकळीच्या दिशेने निघालेले पाईप जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किमान तीन किलोमीटर शिल्लक राहिले आहे.
बेंबळा प्रकल्पावरील जॅकवेल ते टाकळी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत १९ किलोमीटर पाईप टाकायचे आहे. दिशा बदलविल्याने यातील दीड ते दोन किलोमीटर कमी झाले. तरीही १७ किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे. १२ किलोमीटरच लाईन टाकल्याचा दावा केला जात आहे. मात्र मध्ये ब्रेक झाला याचा हिशेब धरला नसावा. आज किमान सात किलोमीटर पाईप टाकायचे आहे. दिवसभरात सहा मीटरचे साधारणत: ३० पाईप टाकले जात आहे. दिवसभरात १८० मीटर काम होत आहे. एक किलोमीटरसाठी सहा दिवसांचा कालावधी लागतो. हा ढोबळ हिशेब केल्यास सात किमीसाठी ४२ दिवस निश्चित आहे. कडक जमीन, नाल्यातून मार्ग असल्यास पाईप टाकण्याची गती मंदावते. शुध्दीकरण केंद्रावरचा मार्ग पहाडातून जातो. या परिस्थितीत दोन महिन्यात टाकळीपर्यंत पाईपलाईन होईल, हे स्वप्नवतच आहे.
पाईपलाईन टाकण्याचे काम चार चमू करत आहे. यात वाढ आणि दिवस-रात्र काम केल्यास कामाची गती वाढून लागणारा कालावधी कमी होऊ शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे. गती वाढली तरच यवतमाळकरांना पावसाळ्यापूर्वी मिळेल...
कामाची गती अन् मनुष्यबळ वाढविल्यास कमी होऊ शकतो कालावधी
टाकळी ते निळोणाचाही वांदा
टाकळीपर्यंत पोहोचलेले पाणी निळोणा आणि चापडोह जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी ८०० मीमीची पाईप लाईन टाकली जाणार आहे. हे अंतर साडेआठ किलोमीटर आहे. टाकळी फाटा ते लकडगंज एवढीच पाईप लाईन पडली आहे. जवळपास चार किलोमीटर आणि तोही शहरातून जाणारा भाग आहे. दिवसभरात दोन ते तीन पाईप टाकल्याचा शहरवासीयांचा अनुभव आहे.
३३ केव्हीची वीज
पाणी ओढण्यासाठी ३३ केव्हीची वीज यंत्रणा उभारली जात आहे. यासाठी ४० वीज खांब टाकले जात आहे. यातील काही काम पूर्ण झाले आहे. ट्रान्सफार्मर पोहोचले आहे. मात्र मोठमोठ्या मोटर लावण्यासाठी फाऊंडेशनच्या कामाला मात्र हात लागलेला नाही. बांधकाम करून त्याला मजबुतीसाठी आवश्यक तेवढा वेळ द्यावा लागणार आहे. अर्थात चांगले क्युरीन होणे गरजेचे आहे. त्यामुळे या कामालाही अवधी लागणार आहे.
तहसील चौकात काँक्रिट रस्ता फुटणार
मेनलाईनमधून निघालेली पाईप लाईन सिमेंट रोडखालून बोगदा करून पुढे नेण्याची योजना होती. मात्र कारागृह विभागाने परवानगी नाकारली. आता याठिकाणी बोगदा करण्यासाठी मशीन लागू शकत नाही. त्यामुळे आता रस्ता फोडून मार्ग काढला जाणार आहे. पालिकेने यासाठी परवानगी दिल्याची माहिती आहे.