राळेगाव नगरपंचायतीपुढे मोकाट जनावरांचे आव्हान

By Admin | Published: September 3, 2016 12:34 AM2016-09-03T00:34:20+5:302016-09-03T00:34:20+5:30

शहरात वाढत चाललेली गावरान व रानटी भटक्या कुत्र्यांची संख्या, झुंडीने आणि कळपाने फिरत असलेली डुकरं, मोकाट जनावरे आदींमुळे

Challenge of Mokat animals before Ralegaon Nagar Panchayat | राळेगाव नगरपंचायतीपुढे मोकाट जनावरांचे आव्हान

राळेगाव नगरपंचायतीपुढे मोकाट जनावरांचे आव्हान

googlenewsNext

भररस्त्यावर ठिय्या : कुत्र्यांच्या झुंडीमुळे नागरिक भयभीत
राळेगाव : शहरात वाढत चाललेली गावरान व रानटी भटक्या कुत्र्यांची संख्या, झुंडीने आणि कळपाने फिरत असलेली डुकरं, मोकाट जनावरे आदींमुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. या जनावरांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान नगरपंचायतीपुढे आहे.
शहरात गावरानी व रानटी कुत्र्यांची टोळी दिवसरात्र सर्वत्र फिरतात. डुकरं, बकऱ्यांच्या लहान पिलांची कुत्रे भर रस्त्यावर, चौकात शिकार करतात. त्यांच्या किंकाळण्याने आणि शिकारीचे दृश्य पाहून, ऐकून नागरिक, बालके भयग्रस्त होतात, दहशतीत येतात. रात्र-रात्र कुत्र्यांच्या भुंकण्याने नागरिकांची झोपमोड होते. त्यामुळे त्यांना विविध शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो. शहरात बालवाडी, अंगणवाडी, कॉन्व्हेंट आदींमध्ये लहान मुले एकेकटे जातात. त्यांचे पालकसुद्धा भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने चिंताग्रस्त राहात आहे.
झुंडी व कळपाने फिरणारे डुक्कर चौकाचौकातील कचरा पसरवितात, नाल्यात हुंदडतात, नागरिकांच्या घरातही घुसतात. त्यांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात विविध रोगराई वाढण्याची भीती आहे. मोकाट जनावरांमुळे त्यांच्या रस्त्यात, चौकात ठाण मांडण्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्यासह शहरातील स्वच्छतेवर विपरित परिणाम होण्यासह विविध प्रश्न निर्माण झाले आहे.
मोकाट जनावरांना खुराक वरचेवर मिळवून देवून शहरातील काही महाभाग त्यांना पोसत आहे. वरून अस्वच्छता, घाण, कचरा शहराच्या शाळा परिसरासह विविध भागात टाकून वातावरण प्रदूषित करीत आहे. अशा लोकांचा शोध घेऊन शहर स्वच्छ ठेवणे आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे. गेली तीन वर्षांपासून नागरिका याबाबत कार्यवाहीची प्रतीक्षा करीत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन सुरू केले आहे. भाजपच्या ताब्यातील या नगरपंचायतीमध्ये त्याची चांगली अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. आगामी काळात गणपती, दुर्गादेवी, दिवाळी आदी सर्व महत्त्वाचे सण आहेत. त्यादृष्टीने आतापासूनच नगरपंचायतीने कामी लागणे आवश्यक आहे. राळेगाव तालुका आणि उपविभागाची उदयोन्मुख आणि विकासान्मुख आणि प्रतिमा आहे. या प्रतिमेची जपणूक करण्याचे आव्हान नगरपंचायतीसमोर आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Challenge of Mokat animals before Ralegaon Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.