‘मुक्कामी’ पोलिसांचे आव्हान
By admin | Published: May 20, 2017 02:30 AM2017-05-20T02:30:58+5:302017-05-20T02:30:58+5:30
जिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत दारव्हा, पुसद, वणी, पांढरकवडा या चार उपविभागातील बदल्या पूर्ण झाल्या.
कर्मचाऱ्यांच्या बदल्या : वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी, चेंज केव्हा?
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. आत्तापर्यंत दारव्हा, पुसद, वणी, पांढरकवडा या चार उपविभागातील बदल्या पूर्ण झाल्या. आता दोन दशकांपासून मुख्यालयी ठाण मांडणाऱ्या कर्मचाऱ्यांना बदलविण्यात येते, की त्यांच्या सोयीने नियमच बदलविला जातो, याकडे पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुख्यालयतील पोलिस मेसमध्ये शिपाई म्हणून कार्यरत एकाने सलग दोन दशकांचा कालावधी पूर्ण केला आहे. ड्युटी मुन्शीचा सहायकही मागील दहा वर्षापासून तेथेच आहे. जिल्हा विशेष शाखेतील संरक्षणचा टेबल सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याने तर तब्बल २२ वर्षे एकाच शाखेत सेवा दिली. पारपत्र विभागातही एक जमादार व एक पोलीस नाईक दहा वर्षापासून मुक्कामी आहेत. स्थानिक गुन्हे शाखेतही एक जमादार व दोन शिपाई दहा वर्षापासून ठाण मांडून आहे. कॅशिअरही दहा वर्षांपासून तेथेच कार्यरत आहे. त्यांची बदली झाली, तरी हे कर्मचारी कोणत्या ना कोणत्या मार्गाने तेथेच परत येतात.
अधिकारी कुणीही येवो, सत्ता मात्र त्यांचीच असते. कामाचा ‘दीर्घ’ अनुभव, तत्परता असे निकष लावून त्यांना तेथेच ठेवले जाते. प्रसंगी मोठी लॉबिंगही होते. त्यामुळे त्यांना कुणीच हात लावण्याचा प्रयत्न करीत नाही. प्रथम अधिकाऱ्यांपुढे आव्हान उभे करणाऱ्या आणि नंतर अधिकाऱ्यांनाच हवेहवेसे वाटणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यासाठी प्रशासकीय बदली प्रक्रियेत मुख्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयाचा क्रमांक शेवटचा ठेवला जातो. परिणामी सक्षम कर्मचारी येथे येण्यास शिल्लकच राहात नाही, असा आजवरचा अनुभव आहे.