वीज चोरी रोखण्याचे आव्हान
By admin | Published: February 9, 2017 12:26 AM2017-02-09T00:26:26+5:302017-02-09T00:26:26+5:30
शहरासह ग्रामीण भागातील वीज चोरी रोखण्याचे तगडे आव्हान विद्युत कंपनीसमोर आहे.
विद्युत कंपनी : आकोडे टाकून वीज पुरवठा, पथकाच्या कामगिरीवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह
यवतमाळ : शहरासह ग्रामीण भागातील वीज चोरी रोखण्याचे तगडे आव्हान विद्युत कंपनीसमोर आहे. घरगुती वापरासह विविध कामांसाठी आकोडे टाकून वीज चोरी केली जात आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी कंपनीकडून केले जाणारे सर्व प्रयोग सपशेल अयशस्वी ठरले असल्याचे दिसून येत आहे. यात प्रामाणिक वीज ग्राहकांचे मात्र नुकसान होत आहे.
रस्त्याच्या कडेला दुकाने थाटून व्यवसाय सुरू करणाऱ्यांसह झोपडीवजा घरात उजेड पडावा यासाठी चोरीची वीज वापरली जात आहे. सहज दृष्टीस पडेल अशा प्रकारे आकोडे टाकून वीज घेण्यात आलेली आहे. अपघाताची कुठलीही भीती अथवा विद्युत कंपनीकडून कारवाई होईल याची थोडीही चिंता न करता वीज चोरी होत आहे.
एकीकडे नागरिकांना अनियमित वीज पुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते, तर दुसरीकडे वीज चोरी सुरू आहे. वीज चोरी रोखण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या पथकाला यश कसे येत नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागात सहज फेरफटका मारला तरी वीज चोरी सापडू शकते. शिवाय शहरी भागात गल्लीबोळांमध्ये सुरू असलेली चोरीही उघड होते. परंतु यासाठी चांगले प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. वीज देयक नियमित भरणाऱ्या ग्राहकांकडे थोडीही रक्कम थकीत झाल्यास वीज पुरवठा तोडण्याची कारवाई केली जाते, मग वीज चोरी का पकडली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्युत कंपनीच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)
उघड्या डीपी धोकादायक
शहर आणि ग्रामीण भागातील उघड्या डीपी धोकादायक ठरत आहे. काही ठिकाणी तर डीपीला दरवाजाच नसल्याचे प्रकार आहे. वीज दुरुस्त केल्यानंतर डीपीचा दरवाजा चांगल्या प्रकारे लावण्याची तसदी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून घेतली जात नाही. कडीकोंडे असतानाही ते पक्के लावले गेले की नाही, याची खात्री करत नाही. काही डीपी रस्त्याच्या अगदी कडेला आहेत. एखाद्यावेळी चुकून डीपीमधील साहित्याला स्पर्श झाल्यास मोठा अपघात होण्याची भीती आहे.