चंदन पार्कला बहरण्याआधीच लागली उधळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 10:39 PM2018-08-20T22:39:24+5:302018-08-20T22:40:15+5:30
दारव्हा मार्गावरील जामवाडी शिवारात निसर्गाच्या चमत्काराने चार हजारावर चंदन वृक्ष उगवले आहेत. त्याला वनविभागाने चंदन पार्क म्हणून जाहीर केले असून तेथे संरक्षण भिंतींचे कामही सुरू आहे.
सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दारव्हा मार्गावरील जामवाडी शिवारात निसर्गाच्या चमत्काराने चार हजारावर चंदन वृक्ष उगवले आहेत. त्याला वनविभागाने चंदन पार्क म्हणून जाहीर केले असून तेथे संरक्षण भिंतींचे कामही सुरू आहे. आता या चंदन वृक्षाला उधळी लागली असून अनेक वृक्ष भर पावसाळ््यात वाळत आहेत. या समस्येवर उपाय शोधण्याची धडपड वनविभागाची यंत्रणा करत आहे.
जामवाडी येथील ग्रामस्थ दफनभूमी म्हणून वापरत असलेल्या वनविभागाच्या जागेत चंदनाची हजारो झाडे असल्याचा उलगडा दीड वर्षापूर्वी झाला. त्यानंतर या वनाच्या संवर्धनासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. कधी काळी उमर्डा नर्सरीत मोठ्या प्रमाणात परिपक्व चंदन वृक्ष होते. हा परिसर आंतरराष्ट्रीय चंदन तस्कारांच्या रडारवर आल्याने अनमोल चंदन ठेवा पाहता पाहता नष्ट झाला. आज उमर्डा नर्सरी परिसरात अवशेषापुरतीच झाडे शिल्लक आहेत. अशा स्थिती जामवाडी शिवारात निसर्गाने निर्माण केलेल चंदन पार्क हाती लागले. त्यावरही उधळीचे आक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. पाच ते सहा फूट उंचीचे झाड येथे आहेत. उधळीने साल खाल्ल्यामुळे झाड वाळत आहेत. पूर्वीची दफनभूमी असल्याने येथे उधळीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचा धोका चंदन वृक्षाला होताना दिसत आहे.
चंदन बनाला महामार्गाचा धोका
वन विभागाची यंत्रणा या वृक्षांच्या संवर्धनासाठी आता वनस्पतीशास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन उपाययोजना करण्याच्या तयारीत आहे. या चंदन पार्कच्या संरक्षणासाठी ४३ लाख रुपये खर्चून भिंत बांधली जात आहे. शिवाय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नैसर्गिक देखावे निर्माण केले जाणार आहे. अगदी महामार्गाला लागूनच चंदन बन तयार झाल्याने त्याच्या संरक्षण व संवर्धनाचे आव्हान वनविभागापुढे आहे. यापूर्वी यवतमाळातून चंदन तस्करीचे प्रकार गाजले होते, हे विशेष.