वारज गावामध्ये साकारणार चंदन पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 09:38 PM2018-07-22T21:38:27+5:302018-07-22T21:39:57+5:30

जिल्हा मुख्यालयापासून १५ किमीवरील वारज गावात चंदन पार्क उभे राहणार आहे. या पार्कमधून प्रेरणा घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चंदन शेतीकडे वळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वनविभागाच्या नेतृत्वात चंदन पार्कचे संपूर्ण कामकाज पार पडणार आहे.

Chandan Park will be set up in Waraj village | वारज गावामध्ये साकारणार चंदन पार्क

वारज गावामध्ये साकारणार चंदन पार्क

googlenewsNext
ठळक मुद्देवनविभागाचा प्रयोग : उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना देणार सामूहिक शेतीचे धडे

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मुख्यालयापासून १५ किमीवरील वारज गावात चंदन पार्क उभे राहणार आहे. या पार्कमधून प्रेरणा घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चंदन शेतीकडे वळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वनविभागाच्या नेतृत्वात चंदन पार्कचे संपूर्ण कामकाज पार पडणार आहे.
यवतमाळ-दारव्हा मार्गावर वारज गाव आहे. यवतमाळ तालुक्यातील या गावालगत वनविभागाची पाच हेक्टर जमीन आहे. यामध्ये सीताफळ, सहद, बोर आणि रानफळांची रेलचेल आहे. याच परिसरात वनविभाग चंदन पार्क साकारणार आहे.
वनपर्यटन विकास योजनेतून चंदन पार्क होणार आहे. यासाठी ४५ लाख रूपयांचा निधी लागणार आहे. वनविभाग चंदनाचे रोप लावणार असून तयार होणारे रोपटे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुणे येथील चंदन तज्ज्ञ महेंद्र घागरे वनविभागाने मागणी केल्यास चंदनाची रोपे पुरविणार आहेत. चंदनाची शेती कशी करावी, अंतर किती असावे, संवर्धनासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती दिली जाणार आहे. चंदनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवे तंत्रज्ञान अवगत करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, चोरीला आळा घालण्यासाठी चंदनाच्या सामूहिक शेतीवर भर देणार आहे.
त्याकरिता डेमो प्लॉटही या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे. कमी पाण्यात येणारे पीक म्हणून चंदनाची शेती फायदेशीर ठरणारी आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्य वनसंरक्षक कार्यालयाने पावले उचलली आहेत. यामुळे काही दिवसात वारज गावामध्ये चंदनाची सुंदर रोपवाटिका पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
लातूरमध्ये प्रयोग यशस्वी
लातूर जिल्ह्यात चंदन शेतीचा प्रयोग शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे. चंदन वृक्षाचे पान, फांद्या आणि खोडापासूनही विविध उत्पादने तयार होतात. यामुळे लातूरमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात चंदन शेतीकडे वळत आहेत. आता यवतमाळ जिल्ह्यात चंदन शेतीचा प्रयोग करण्याच्या दृष्टीने वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहे.

वनपर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून चंदन पार्क उभे केले जात आहे. ही अभिनव संकल्पना शेतकºयांना प्रेरणा देणारी ठरणार आहे.
- भानुदास पिंगळे,
उपमुख्य वनसंरक्षक, यवतमाळ

शासनाचा एक पैसाही न घेता चंदनाची रोपे मोफत वाटण्याची मोहीमच आम्ही हाती घेतली आहे. राज्यासह परराज्यातही चंदन लागवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत २५ लाख रोपांची लागवड झाली आहे. यातून प्रांत समृद्ध होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.
- महेंद्र घागरे,
चंदन तज्ज्ञ,
विद्यापीठ सिनेट सदस्य, पुणे

Web Title: Chandan Park will be set up in Waraj village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.