गोपालपूर रोपवाटिकेत चंदन तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 10:18 PM2019-01-17T22:18:26+5:302019-01-17T22:19:34+5:30

पांढरकवडा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गोपालपूर मध्यवर्ती रोपवाटिकेतून पाच चंदनाची झाडे बुंद्यापासून आरीने कापून चंदन तस्करांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. तस्करांनी आठ दिवसांपूर्वी ही चोरी केली.

Chandan smuggling in Gopalpur ropewat | गोपालपूर रोपवाटिकेत चंदन तस्करी

गोपालपूर रोपवाटिकेत चंदन तस्करी

Next
ठळक मुद्देपाच मोठी झाडे लंपास : अन्य झाडांवरही तस्करांनी फिरविली आरी, वन अधिकारी अनभिज्ञ

बंडू कर्णेवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : पांढरकवडा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गोपालपूर मध्यवर्ती रोपवाटिकेतून पाच चंदनाची झाडे बुंद्यापासून आरीने कापून चंदन तस्करांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. तस्करांनी आठ दिवसांपूर्वी ही चोरी केली. या तस्करांनी चंदनाच्या इतरही पाच ते सहा झाडांना आरीने कापून नेण्याचा प्रयत्न केला.
पाच ते सहा चंदनाच्या झाडांवर आरीच्या खुणा स्पष्ट दिसून येत असून चोरून नेलेल्या चंदनाच्या झाडांचे बुंदे घटनास्थळावर दिसत आहेत. पाच चंदनाच्या झाडांवर चोरट्यांनी हात साफ केले आणि फांद्या मात्र तेथेच फेकून देऊन पोबारा केला. लाखो रुपयांची मालमत्ता चोरीला जाऊनही याचा थांगपत्ता वनपरिक्षेत्र पांढरकवडाअंतर्गत कार्यरत वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू नये, यात चंदन तस्कर व वनअधिकारी यांची मिलीभगत तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. कत्तल करण्यात आलेल्या चंदनाच्या झाडांची घटनास्थळी जाऊन चौकशी केल्यास मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.
पाच झाडांची चोरी पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आली असून तस्करांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान वन विभागापुढे ठाकले आहे. गोपालपूर मध्यवर्ती रोपवाटिका येथून सात किलोमीटर अंतरावर असून पांढरकवडा-शिबला मार्गावर दोन्ही बाजुला ९.९७ हेक्टर वनपरिक्षेत्रात विस्तारलेली आहे. सर्व्हे नंबर १०१ मध्ये ई-वर्ग जमीन आहे. सदर रोपवाटिकेत विविध रोपांची लागवड करून तेथे रोपटी तयार केली जातात. या रोपवाटीकेत इतरही अनेक प्रकारची मोठमोठी झाडे असून यात चंदनाचीसुद्धा झाडे आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण रोपवटीकेला तारेचे कंपाऊंड व मुख्य प्रवेशद्वार आहे. रोपवाटीकेतून चंदनाची झाडे चोरी गेल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने खात्री करण्यासाठी सदर रोपवाटिकेत फेरफटका मारला असता, तेथे केवळ एक रोजंदारी कर्मचारी दिसला. वनविभागाचा एकही कर्मचारी वा अधिकारी तेथे उपस्थित नव्हता. एवढी मोठी चोरी होऊनही वन कर्मचारी व अधिकारी याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले. वनविभागाने एवढी मोठी रोपवाटिका वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येते. याचाच फायदा तस्करांनी घेतला. सात ते आठ दिवसांपूर्वी तस्करांनी या रोपवाटिकेत शिरून चंदनाची झाडे लंपास केली. दुसऱ्या दिवशी घटनेची माहिती मिळताच, येथील वन कर्मचाऱ्यांनी प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून झाडांच्या फांद्या गोळा करून रोपवाटिकेत ठेवल्या. वनविभागाच्या वतुर्ळात दबक्या आवाजात चंदन तस्कर व गोपालपूर रोपवाटिकेतील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने या झाडांची विल्हेवाट लावण्यात आल्याची चर्चा आहे. यवतमाळच्या वनसंरक्षकांनी याची दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करून संधीसाधू दोषी वनअधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी आहे.
वन्यप्राण्यांच्या शिकारीत मोठी वाढ
पांढरकवडा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जंगलांमध्ये वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ झाली आहे. आठ दिवसांपूर्वी चितळाची शिकार करण्यात आल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. मात्र अशा अनेक शिकारी दडपल्या जात असल्याची चर्चा परिसरात आहे. मोर, हरिण, ससे आदी प्राणी शिकाऱ्यांच्या रडारवर आहे. या वन्यजीवांच्या मांसाची खवय्यांककडून चांगलीच मागणी असते. त्यामुळे या प्राण्यांच्या शिकारी केल्या जात आहेत.

Web Title: Chandan smuggling in Gopalpur ropewat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.