शेतकऱ्यांना मारक कायदे बदला!

By admin | Published: March 20, 2017 12:18 AM2017-03-20T00:18:09+5:302017-03-20T00:18:09+5:30

कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांची व्याख्या जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही.

Change the deadly laws of farmers! | शेतकऱ्यांना मारक कायदे बदला!

शेतकऱ्यांना मारक कायदे बदला!

Next

अमर हबीब : महागावच्या अन्नत्याग आंदोलनात राज्यातील मान्यवरांची उपस्थिती
महागाव : कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांची व्याख्या जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. ८७ टक्के शेतकरी आत्महत्या या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आहेत. सिलिंगचा कायदा, जीवनावश्यक वस्तूंचा कायदा हे शेतकऱ्यांना अधोगतीकडे नेणारे आहेत. असे कायदे संपुष्टात आणा, अशी मागणी अन्नत्याग आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केली.
चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली. महाराष्ट्रातील या पहिल्या शेतकरी आत्महत्येला ३१ वर्षे झाली तरी शासनाची धोरणे बदललेली नाही. त्यामुळे रविवारी महागावातून राज्यव्यापी अन्नत्याग आंदोलन पुकारण्यात आले. याप्रसंगी अमर हबीब बोलत होते. महागाव बसस्थानकासमोर झालेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे होते. खासदार राजू शेट्टी, आमदार आशीष देशमुख, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार ख्वाजा बेग यांच्यासह राज्यभरातील अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदविला.
चंद्रकांत वानखडे म्हणाले, शासन प्रत्येक गोष्टीची हमी मागते. ऐंशीच्या दशकात पेटून उठणारा शेतकरी आज आंदोलनात सहभागी होत नाही, यावर आपण आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. एखादी जखम भरायची झाली तरी त्याला कापसाची गरज पडते. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. शेतकरी एकसंघ नाही. त्याचा फायदा शासनकर्ते घेत आहेत.
खासदार राजू शेट्टी म्हणाले, जे शेतीतून बाहेर पडले त्यांनीही अडचणीतील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले पाहिजे. स्वामिनाथन आयोगाचे विधेयक मंजुरीसाठी टाकताना सर्वच हो म्हणाले. प्रत्यक्षात मी एकटाच राहिलो. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, माजी आमदार विजय खडसे यांनीही विचार मांडले. खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांनी संवेदना संदेश पाठविला. चंद्रकांत वानखडे यांनी अमर हबीब यांना लिंबू शरबत देऊन सांगता केली. या आंदोलनात डॉ. विश्वनाथ विनकरे, देवेंद्र भुयार, सुरेश रोहणेकर, शरद पाटील, जगदीश नरवाडे, नगराध्यक्ष सुनिल नरवाडे, उदय नरवाडे, प्रा. विलास भवरे, योगेश वाजपेयी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाऊराव चौधरी, संदीप ठाकरे, प्रमोद भरवाडे, शैलेश कोपरकर, संभाजीराव नरवाडे, गजेंद्र देशमुख, गजानन नांदेकर, कास्ट्राईब संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र कावळे, विशाल पांडे, अशोक तुमवार, अ‍ॅड. विवेक देशमुख, मनीष जाधव, विनोद पाटील, गोपाल चव्हाण, सतीश चव्हाण, प्रशांत ठाकरे, प्रदीप पाटील, मुकेश टापरे, शुभम मुंडवाईक, मिथून अलाटे, गौरव नाईकर, सुधाकर जाधव, पुरुषोत्तम राठोड, नगरसेवक नारायण शिरबिरे, रामचंद्र तंबाखे व असंख्य नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Change the deadly laws of farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.