विधानसभेपूर्वी जिल्हा भाजपात चेंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 09:47 PM2019-08-19T21:47:01+5:302019-08-19T21:48:55+5:30

विधानसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या महिनाभरावर आलेली असताना प्रदेश भाजपने यवतमाळ जिल्ह्यात नेतृत्व बदलाचा धाडसी निर्णय घेतला. जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी सोमवारी उमरखेड येथील स्वीकृत नगरसेवक नितीन भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली.

Change in district BJP before assembly | विधानसभेपूर्वी जिल्हा भाजपात चेंज

विधानसभेपूर्वी जिल्हा भाजपात चेंज

Next
ठळक मुद्देनितीन भुतडा नवे जिल्हाध्यक्ष : आमदाराच्या पाचही जागा राखण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या महिनाभरावर आलेली असताना प्रदेश भाजपने यवतमाळ जिल्ह्यात नेतृत्व बदलाचा धाडसी निर्णय घेतला. जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी सोमवारी उमरखेड येथील स्वीकृत नगरसेवक नितीन भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही नियुक्ती केली.
आतापर्यंत जिल्हा भाजपचे अध्यक्षपद बहुतांश यवतमाळ जिल्हा मुख्यालयीच राहिले आहे. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच उमरखेड सारख्या मराठवाड्याच्या सीमावर्ती तालुक्याला जिल्हाध्यक्ष पदाचा मान दिला गेला आहे. एकदा दारव्हा तालुक्याला ही संधी मिळाली होती. गेली अनेक वर्ष भाजपचे जिल्हाध्यक्षपद राजेंद्र डांगे यांच्याकडे होते. त्यांना दोन वेळा मुदतवाढही देण्यात आली. विधानसभेच्या आगामी निवडणुकासुद्धा जिल्ह्यात डांगे यांच्याच नेतृत्वात लढल्या जातील असे मानले जात असतानाच सोमवारी अचानक नव्या जिल्हाध्यक्षाची नियुक्ती झाल्याने भाजपच्या गोटात खळबळ निर्माण झाली. २०१४ च्या निवडणुका मोदी लाटेत भाजपने जिंकल्या. काँग्रेसकडे असलेल्या विधानसभेच्या वणी, आर्णी, राळेगाव, यवतमाळ व उमरखेड या पाचही जागा भाजपने आपल्याकडे खेचून घेतल्या. जिल्हाध्यक्ष म्हणून त्याचे श्रेय डांगे यांना दिले जात होते. परंतु आता लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ताब्यातील आर्णी व वणी या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार हंसराज अहीर मोठ्या फरकाने माघारले. शिवसेनेला यवतमाळ-वाशिम व हिंगोलीमधील उमरखेड मतदारसंघात आघाडी मिळाली. परंतु त्यात सेनेचाच वाटा अधिक असल्याचे शिवसैनिक सांगत आहेत. कदाचित वणी व आर्णी विधानसभा मतदारसंघात पक्ष लोकसभेत माघारल्याचा फटका तर डांगे यांना बसला नाही ना अशी शंका राजकीय गोटात व्यक्त केली जात आहे. तसे असेल तर थेट जिल्हाध्यक्षांवर पक्षाने कारवाई करण्याऐवजी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांवर कोणतीच कारवाई का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हाध्यक्षाला थेट पदावरून हटविण्यात आले. हाच निकष लावला तर आगामी विधानसभा निवडणुकीत वणी व आर्णीच्या विद्यमान आमदाराचे तिकीट तर कापले जाणार नाही ना अशी शंकाही भाजप कार्यकर्त्यांच्या गोटात व्यक्त केली जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा भाजपची धुरा प्रदेशाध्यक्षांनी मोठ्या विश्वासाने नितीन भुतडा यांच्या खांद्यावर टाकली. हा विश्वास सार्थ ठरविण्यात ते कितपत यशस्वी ठरतात हे विधानसभेच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे, एवढे निश्चित. नितीन भुतडा यांच्या नियुक्तीने कुण्या नेत्याचे किती वजन याची चर्चा होत आहे. त्याच वेळी राजेंद्र डांगे यांना अचानक जिल्हाध्यक्ष पदावरून हटविण्याचे नेमके कारण काय याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहे.

उमरखेडच्या भाजप आमदाराला ‘चेक मेट’
नितीन भुतडा यांची भाजप जिल्हाध्यक्षपदी झालेली नियुक्ती म्हणजे उमरखेडचे भाजप आमदार राजेंद्र नजरधने यांना पक्षाकडून दिलेला ‘चेक मेट’ मानला जात आहे. सुरुवातीला भुतडा व नजरधने एकत्र होते. मात्र निवडणुकीनंतर काही महिन्यातच आमदारांचे रिमोट भुतडा यांच्या हातून निसटले. तेथूनच या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. अलिकडे हा वाद टोकाचा वाढला आहे. दोघेही एकमेकाला पाण्यात पाहत असल्याचे बोलले जाते. आमदारावर निशाणा साधण्यासाठी अनेकदा प्रथम नागरिकाचाही वापर केला जातो. भुतडा यांच्या नियुक्तीने मात्र आमदार विरोधी गटाला मोठी ताकद मिळाल्याचे मानले जाते. ही ताकद कुणाच्या पथ्यावर पडते हे पाहणे महत्वाचे ठरते.

जागा वाढविण्याचा प्रयत्न - भुतडा
जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा भाजपकडे आहेत. आपल्या नेतृत्वात या पाचही जागा कायम ठेऊन पुसदची जागा भाजपकडे खेचून घेण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. प्रत्यक्ष निवडणूक जारी होण्यास आणखी किमान एक महिना आहे. या काळात उमरखेडपासून वणीपर्यंत शक्यतेवढ्या गतीने पक्षबांधणी करून संघटन मजबूत करण्यावर आपला भर राहणार असल्याचे भुतडा यांनी स्पष्ट केले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा बदल आपल्यासाठी मोठे आव्हानच आहे. परंतु हे आव्हान नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या साथीने आपण समर्थपणे पेलू, असेही नितीन भुतडा यांनी सांगितले.

Web Title: Change in district BJP before assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.