'गावाच्या विकासासाठी कामाची पद्धत बदला', भास्कर पेरे पाटलांचा सरपंचांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 05:52 PM2024-08-02T17:52:33+5:302024-08-02T17:53:18+5:30
Yavatmal : भास्कर पेरे पाटील आर्णी येथे व्याख्यान, सरपंच, उपसरपंचांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी: गावाचा विकास साधायचा असेल तर आपल्याला कामाची पद्धत बदलवावी लागेल. फळझाडे लावून आपल्याला गावाची समृद्धी साधता येईल. गावात पिण्याचे स्वच्छ पाणी कसे देता येईल, जेणेकरून ग्रामस्थ निरोगी राहतील अशा उपाययोजना केल्या पाहिजे. यामुळे पैसे, महिलांचे श्रम वाचतील, असे प्रतिपादन आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले. आपण यासाठी काय प्रयोग केले हेही त्यांनी सांगितले.
माजी आमदार राजू तोडसाम यांनी आर्णी येथे आयोजित केलेल्या व्याख्यानप्रसंगी भास्कर पेरे पाटील यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी गाव विकासाच्या दृष्टीने यावेळी विविध उदाहरणे दिली. यात स्वच्छता, पिण्याचे पाणी या बाबींवर अधिक भर देण्यात आला. स्वच्छतेसाठी दररोज गाव झाडणे किती गरजेचे आहे, हे त्यांनी उदाहरणासह सांगितले.
शौचालयाचा वापर आपण केला पाहिजे हे त्यांनी सांगितले. शिक्षणावरही त्यांनी मार्गदर्शन केले. काही लोक मुलींना शिक्षण घेऊ देत नाही, हे चुकीचे आहे. शिक्षण वाया जात नाही. शिक्षणाकडे आपण गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. महिला सक्षम झाल्या तरच आपले गाव, घर, राज्य, देश सक्षम होईल.
गावविकासाच्या दृष्टीने आपण काय प्रयोग केले हे सांगितले. शेतीत सिंचन वाढवले आहे. गावात पिण्याचे, वापरण्याचे मुबलक पाणी उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय अनेक सुविधा देऊन गावाचा आणि नागरिकांचा विकास साधल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. गावाचा विकास करणे कठीण नाही. याची सुरुवात कुठेतरी केली पाहिजे, असे भास्कर पेरे पाटील म्हणाले.
यावेळी राजू तोडसाम, प्रिया तोडसाम यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन इनूस शेख यांनी केले. आभार अॅड. राहुल ढोरे यांनी मानले. मंचावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर डकरे आदी मान्यवर उपस्थित होते.