दस्तावेज हरविणाऱ्या कंपनीला चपराक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 09:33 PM2018-12-24T21:33:09+5:302018-12-24T21:33:31+5:30
कर्जापोटी गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तेचे दस्तावेज हरविणाऱ्या दिवाणी हाऊसिंग फायनान्सला जिल्हा ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. दस्तावेजाच्या दुय्यम प्रती उपलब्ध करून द्याव्या, सदोष सेवेबद्दल ३० हजार रुपये द्यावे असा आदेश मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य सुहास आळशी यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कर्जापोटी गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तेचे दस्तावेज हरविणाऱ्या दिवाणी हाऊसिंग फायनान्सला जिल्हा ग्राहक न्यायालयाने चपराक दिली आहे. दस्तावेजाच्या दुय्यम प्रती उपलब्ध करून द्याव्या, सदोष सेवेबद्दल ३० हजार रुपये द्यावे असा आदेश मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य सुहास आळशी यांनी दिला आहे.
येथील राजू रामभाऊ पाटील यांनी दिवाणी हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनकडून घर बांधणीसाठी कर्ज घेतले. त्यासाठी आवश्यक ते सर्व दस्तावेज या कंपनीला सुपुर्द करण्यात आले. घेतलेल्या कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतर राजू पाटील यांनी या कंपनीकडे मालमत्तेच्या दस्तावेजाची मागणी केली. त्यावेळी कंपनीकडून टाळाटाळ सुरू झाली. दस्तावेज सापडल्यानंतर परत केले जाईल, असे त्यांना सांगितले गेले.
दिवाणी हाऊसिंग फायनान्सकडून अडवणूक होत असल्याने पाटील यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचात धाव घेतली. या प्रकरणात मंचाने दोनही बाजूंचा युक्तिवाद जाणून घेतला. यात कंपनीने पाटील यांना सदोष सेवा दिल्याचे स्पष्ट झाले. जबाबदारी पार पाडण्यात कंपनी अपयशी ठरल्याचे मंचाने निकालात म्हटले आहे.
फायनान्स कंपनीने संपूर्ण दस्तांच्या दुय्यम प्रती संबंधित कार्यालयातून काढून द्याव्या, सेवेत त्रुटी केल्याने नुकसान भरपाईपोटी ३० हजार रुपये द्यावे, शारीरिक व मानसिक त्रासापोटी दहा हजार आणि तक्रार खर्चाचे तीन हजार रुपये देण्यात यावे, असा आदेश दिला आहे. या निर्णयाने दिवाणी फायनान्सला चपराक बसली आहे.
कंपनीने दिली कबुली
राजू पाटील यांचे दस्त शोधूनही सापडले नाही. त्यामुळे परत करण्यास असमर्थ आहे, अशी कबुली कंपनीने दिली. दस्तावेज सांभाळून ठेवणे आणि कर्ज नील झाल्यावर परत करणे, हे कर्तव्य आहे. मात्र दिवाणी फायनान्स कंपनीचा बेजबाबदारपणा या प्रकरणात उघड झाला.